उपाशीपोटी सुरक्षारक्षकांचा रुग्णालयात खडा पहारा!
By admin | Published: September 23, 2016 11:26 PM2016-09-23T23:26:38+5:302016-09-24T00:19:22+5:30
ढेबेवाडीतील प्रकार : दहा महिन्यांपासून पगार नाही; आंदोलनाचा इशारा
बाळासाहेब रोडे ल्ल सणबूर
सांगली सुरक्षा रक्षकांकडून भरती झालेल्या ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील चार सुरक्षा रक्षकांना दहा महिन्यांचा पगारच न मिळाल्याने हे सुरक्षारक्षक कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. सध्या त्यांची उपासमार सुरू असून, साडेचार लाखांची थकबाकी न मिळाल्यास कुटुंबीयांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात चार सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. मार्च २०१६ अखेरीस या सुरक्षारक्षकांचे डिसेंबर ते फेब्रुवारी अशा चार महिन्यांचे १ लाख ३७ हजार २०८ रुपये मंजूर होऊन आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणा दाखविल्याने ती रक्कम परत गेली. या प्रकाराने सुरक्षा रक्षकांमध्ये तीव्र असंतोष आहे. काही महिन्यांपूर्वी सातारा येथील जिल्हा रुग्णालयामधील सुरक्षा रक्षकांनी पगार न मिळाल्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ती वेळ आमच्यावर आणू नका, असे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे.
आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नाने ढेबेवाडी येथे हे रुग्णालय मंजूर झाले आहे. या रुग्णालयात सुरक्षा रक्षक भरतीसाठी चौदा महिन्यांपूर्वी सांगली सुरक्षा रक्षक मंडळाकडून चार सुरक्षा रक्षक भरती करण्यात आले. पहिल्या चार महिन्यांचा पगार या सुरक्षा रक्षकांनी धडपड करून मिळविला होता. त्यानंतर डिसेंबर २०१५ पासून सुरक्षा रक्षकांना पगारच मिळालेला नाही. पगार होईल, या आशेवर येथील रक्षक दिवस ढकलत आहेत. दहा महिने पगार न झाल्याने रक्षकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मार्च महिन्यामध्ये चार महिन्यांची ग्रॅण्ड मंजूर झाली होती. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला विणवण्याही केल्या होत्या. मात्र, ढिसाळ कारभारामुळे ते पैसे परत गेले. तेव्हापासून सुरक्षा रक्षकांचा पगार झालेला नाही. सप्टेंबर अखेरपर्यंत पैसे न मिळाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
ढेबेवाडी रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची नेमणूक सांगली सुरक्षारक्षक मंडळामार्फत झाली आहे. त्याचे कॉन्ट्रॅक्ट पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांकडे आहे. सुरक्षारक्षकांचा पगार तेथूनच येतो. जिल्हा रुग्णालयाकडून तो आमच्या रुग्णालयाकडे पाठविला जातो. दहा महिन्यांपासून या सुरक्षारक्षकांच्या पगाराचे अनुदान उपलब्ध झालेले नाही. या संदर्भात आम्ही प्रत्येक महिन्याला लेखी व तोंडी मागणी करून तसा पत्र व्यवहार केला आहे.
- डॉ. डी. बी. डोंगरे,
अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, ढेबेवाडी
दीड वर्षापूर्वी आमची ढेबेवाडी रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीच्या चार महिन्यांत आम्हाला वेळेवर पगार मिळाला. मात्र, गेली दहा महिने आम्हाला पगारच मिळालेला नाही. याबाबत आम्ही सांगली सुरक्षारक्षक मंडळाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. दहा महिन्यांपासून पगारच नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
- राजाराम कदम,
सुरक्षारक्षक ग्रामीण रुग्णालय, ढेबेवाडी