फसवणुकीचे नवनवे फंडे! गुंतवणुकीची नको घाई, हडप होईल कष्टाची कमाई

By संजय पाटील | Published: June 14, 2023 12:09 PM2023-06-14T12:09:38+5:302023-06-14T12:39:16+5:30

गुंतवणूक वाढविण्यासाठी काहींनी एजंट नेमले

Consider investing in any private sector | फसवणुकीचे नवनवे फंडे! गुंतवणुकीची नको घाई, हडप होईल कष्टाची कमाई

फसवणुकीचे नवनवे फंडे! गुंतवणुकीची नको घाई, हडप होईल कष्टाची कमाई

googlenewsNext

संजय पाटील

कऱ्हाड : कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडेही सोपवताना काळजी घ्यायला हवी. अल्पावधीत पैसे वाढवून मिळण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवू शकते. चांगला परतावा, आकर्षक व्याज आणि कमी कालावधीत दामदुप्पट हे सध्या फसवणुकीचे फंडे बनलेत. त्यामुळे कोणत्याही खासगी क्षेत्रात पैसे गुंतवताना एकदा नव्हे तर दहा वेळा विचार करायला हवा.

कऱ्हाडात चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची तब्बल पन्नास लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर दरमहा चार टक्क्याने परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित राहणार असल्याचे सांगून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूकदारांना परतावाही देण्यात आला.

मात्र, तीन-चार महिन्यातच परतावा मिळणे बंद झाले. तसेच गुंतवलेली रक्कमही गुंतवणूकदारांना परत मिळालेली नाही. मुळातच एक खासगी फर्म दरमहा चार टक्के म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकांच्या व्याजदरापेक्षा कित्येक पटींनी जास्त परतावा कशी देऊ शकते, ही बाब विचार करायला लावणारी आहे.

गुंतवणूकदारांनी सुरुवातीला केवळ हा एकच विचार केला असता तरी स्वत:ची फसवणूक टाळता आली असती. मात्र, जास्त परतावा मिळणार आणि मूळ रक्कम सुरक्षित राहणार, या हव्यासाने अनेकांनी असुरक्षित गुंतवणूक केली आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. एक-दोन नव्हे तर कित्येक लाख रुपये बेमालुमपणे हडपले गेले. त्यामुळे पैशांची गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी मिळणाऱ्या लाभापेक्षा गुंतवणाऱ्या रकमेचा विचार करणे गरजेचे बनले आहे.

काय असते आमिष?

चांगला परतावा : अनेक जण गुंतवणूक करून घेताना गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतात. दरमहा परतावा आणि मूळ रक्कम सुरक्षित, ही फसवी ऑफर दिली जाते.

आकर्षक व्याजदर : राष्ट्रीयकृत, सहकारी बँका तसेच पतसंस्थाही ठेवींवर जास्तीत जास्त आठ टक्केपर्यंत वार्षिक व्याजदर देतात. मात्र, फसवणुकीच्या उद्देशाने पैसे घेणारे दरमहा चार ते पाच म्हणजेच वार्षिक पंचवीस ते तीस टक्क्याने परतावा देण्याचे आमिष दाखवतात.

अल्पावधीत दामदुप्पट : गुंतवलेली रक्कम दुप्पट होण्यासाठी बँका, पतसंस्था किमान सात वर्षांचा कालावधी घेतात. मात्र, फसवणूक करणारे अगदी चार ते पाच वर्षात दामदुप्पट देण्याचे ‘गाजर’ दाखवतात.

मूळ रक्कम सुरक्षित : गुंतवणूकदाराने जी रक्कम गुंतवली आहे, ती रक्कम सुरक्षित राहणार असल्याची खात्री देत त्या रकमेचा धनादेशही काहीजण देतात. मात्र, प्रत्यक्षात तो धनादेश बँकेत वटत नाही, हे गुंतवणूकदाराला फसवणुकीनंतर लक्षात येते.

ठेवींवर कोण किती देते व्याजदर?
७ : राष्ट्रीयकृत बँका
९ : सहकारी बँका
९.५ : पतसंस्था
१० : पतपेढी
१०.५ : क्रेडीट सोसायटी
(आकडेवारी टक्केवारीमध्ये)

दाेन टक्के कमिशनवर एजंट

गुंतवणूक वाढविण्यासाठी काहींनी एजंट नेमले आहेत. हे एजंट वेगवेगळी आमिषे दाखवून तसेच खात्री देऊन गुंतवणूक करायला प्रवृत्त करतात. त्या मोबदल्यात एजंटांना गुंतवलेल्या रकमेतील सुमारे दाेन टक्के कमिशन दिले जाते.

Web Title: Consider investing in any private sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.