गुरुजींची शैक्षणिक, अशैक्षणिक कामे ठरली !, शासनाने अध्यादेश काढला
By प्रगती पाटील | Published: August 24, 2024 04:48 PM2024-08-24T16:48:07+5:302024-08-24T16:50:46+5:30
सातारा : शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणाऱ्या कामाचा ताण लक्षात घेता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण ...
सातारा : शिक्षकांवर अध्यापनाशिवाय येणाऱ्या कामाचा ताण लक्षात घेता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार गावात स्वच्छता अभियान राबविणे आणि हागणदारीमुक्त अभियानात सहभागी होण्यासह तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून शिक्षकांना राहणे अशैक्षणिक काम ठरवले आहे.
मात्र, सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे, मुलांचा शोध घेणे व नजीकच्या शाळेत त्यांची नावनोंदणी करणे ही शैक्षणिक कामे ठरविण्यात आली आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी अध्यादेश काढला आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना शैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई केली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशी अशैक्षणिक कामे दिली जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असल्याचे मत देण्यात आले होते.
यावर योग्य तो निर्णय घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली. या समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करून शासनास अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शिक्षक शासकीय असला तरी त्यांनी निर्देशित केलेलीच शैक्षणिक कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शैक्षणिक कामे
शासन निर्णयानुसार शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे, अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे, याकडे लक्ष देणे, विद्यार्थी बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रेकिंग करणे, शिष्यवृत्ती परीक्षेसह ‘एनएमएमएस’, ‘एनटीएस’, ‘एमटीएस’, प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व क्रीडा विकास करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यसंस्कार, राष्ट्रीय नेते यांची जयंती, पुण्यतिथी इतर दिनविशेष साजरे करणे, शाळास्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष, सचिव म्हणून कामकाज ही सर्व शैक्षणिक कामे आहेत.
अशैक्षणिक कामे
गावात स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त अभियान राबविणे, गावातील तंटामुक्ती व इतर समित्यांवर सदस्य म्हणून काम करणे, इतर संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण, पशू सर्वेक्षण, शौचालय सर्वेक्षण आदी सर्वेक्षणाची महसूल विभागाची कामे, जी माहिती संकलनीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागवणे, शासनाच्या मान्यतेशिवाय अनावश्यक असलेली प्रशिक्षणे, कार्यशाळेत, उपक्रम, अभियान, मेळावे यामध्ये ऑनड्युटी सहभाग घेणे ही अशैक्षणिक कामे ठरविण्यात आली आहेत.