‘आरएसएस’च्या सेवाकार्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:36+5:302021-05-13T04:39:36+5:30
कऱ्हाड : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाकाळातील सेवाकार्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती. या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असताना, ...
कऱ्हाड : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोनाकाळातील सेवाकार्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली होती. या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असताना, संघाच्या सेवाकार्याला गालबोट लावण्याचे षड्यंत्र काही समाजकंटकांनी केले आहे, असा आरोप संघाचे जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे व जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह संदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आपल्या देशातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर प्रशासनाच्या मदतीसाठी केवळ सेवाकार्याच्या भावनेने संघ स्वयंसेवक पुढे आले आहेत. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन शुक्रवार (दि. ७) पासून लसीकरण केंद्रावर संघ स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करीत आहेत. यामध्ये लसीकरण केंद्र साहाय्यता कक्ष, नावनोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य, गर्दी नियंत्रण यांमध्ये संघ स्वयंसेवक जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत करीत आहेत.
यासाठी आवश्यक ती पूर्वपरवानगी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांच्याकडून घेऊनच संघ स्वयंसेवक केंद्रामध्ये सेवा देत होते. त्यामुळे केंद्रावर कार्यरत कर्मचारी व रुग्णालय प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच स्वयंसेवकांमुळे नागरिकांच्या शंकांचे समाधान योग्य पद्धतीने होत आहे. वेळ वाचत असल्याने अनेकांनी या कार्याचे कौतुकही केले आहे. त्यामुळे नागरिक व स्वयंसेवक यांच्यामध्ये वादाचा प्रश्नच नाही.
लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंटनुसारच नागरिकांचा नंबर लागत आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाचे धोरण पारदर्शक आहे. मात्र संघ स्वयंसेवक समाजाच्या मदतीला धावून आलेले पाहून अनेकांना पोटशूळ उठला व त्यांनी संघावर चुकीचे आरोप केले आहेत. संघाच्या कार्याला गालबोट लावण्याचा गलिच्छ प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत.
दरम्यान, समाजातील अधिकाधिक घटकांनी एकत्रित येऊन योगदान देऊया. या कोरोनाच्या संकटावर मात करूया, असे आवाहनही स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रीकांत एकांडे व संदीप कुलकर्णी यांनी केली आहे.