राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी भुजबळांचे षडयंत्र, मनोज जरांगे-पाटील यांचे टीकास्त्र
By प्रमोद सुकरे | Published: November 18, 2023 04:44 PM2023-11-18T16:44:12+5:302023-11-18T17:03:22+5:30
कराडला यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळाला अभिवादन
कराड : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला दिशा दिली आहे. म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक झालो. पण त्यांचे नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते विषारी वक्तव्य करून आपली मुख्यमंत्री होण्याची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी जातीय दंगली भडकवण्याचे षडयंत्र करीत असल्याची टीका मनोज जरांगे - पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरती केली. आज, शनिवारी सकाळी जरांगे- पाटील यांनी कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांची ते बोलत होते.
जरांगे -पाटील म्हणाले, छगन भुजबळ हे राज्यात सत्तेमध्ये आहेत. ते मंत्री आहेत. पण निजामशाहीचा विचार त्यांच्या डोक्यात भिनला आहे. मराठ्यांना कुणबीचे पुरावे मिळाले तर दाखले द्यावे लागतील हे त्यांना माहित आहे. आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी त्यांच्या पोटामध्ये असणारा विखारी विचार त्यांनी सभेमधून गटारगंगेच्या माध्यमातून बाहेर टाकला आहे. ते सगळ्यांनी ऐकले आहे.
मी माहिती घेतो
पंढरपूर येथे कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना पूजेसाठी येण्यासाठी तेथील मराठा समाजाने विरोध केला आहे. याबाबत विचारले असता, मला नक्की परिस्थिती माहिती नाही .ती माहिती घेतो. मी तेथील लोकांशी बोलतो असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
प्रसिद्धीसाठी काहीही बरळायचे ही भुजबळांची पद्धत
समोर गर्दी दिसली, माध्यमांचे प्रतिनिधी दिसले की प्रसिद्धीसाठी काहीही बरळायचे ही भुजबळांची पद्धत आहे. परंतु ३०/३५ वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या मुरब्बी भुजबळांना हे शोभत नाही असेही जरांगे-पाटील म्हणाले.