हवालदार सचिन काळंगे अनंतात विलीन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:11+5:302021-01-10T04:31:11+5:30
अंगापूर : खडकी (पुणे) येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या वर्णे येथील ...
अंगापूर : खडकी (पुणे) येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मुख्य कार्यालयात कर्तव्य बजावताना शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या वर्णे येथील जवान हवालदार सचिन विष्णू काळंगे (वय ४०) यांच्या पार्थिवावर वर्णे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सचिन काळंगे यांच्या निधनाची माहिती मिळताच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी त्यांच्या गावी आणण्यात आले. काही काळ त्यांच्या राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांनाही शोक अनावर झाला.
दरम्यान, सैन्यदल, प्रशासन, पोलीस, लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रांतील मान्यवर ग्रामस्थांच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी आ. शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी सोपान टोणपे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, मंडलाधिकारी संतोष झनकर, धनंजय शेडगे, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
सचिन काळंगे हे सैन्य दलाच्या बाॅम्बे इंजनिअरिंग ग्रुपमधे २००० मध्ये भरती झाले होते. तेव्हापासून त्यांनी जम्मू-काश्मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, इलाहाबाद, अरुणाचल प्रदेश, गुजरात तसेच तीन वर्षे राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार या पदावर सेवा बजावली होती. काळंगे यांच्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील तब्बल २७ जणांनी भारतीय सैन्यदलात सेवा दिली आहे, देत आहेत. त्यांच्या पश्चात सैन्य दलातून निवृत्त झालेले वडील विष्णू, बंधू संदीप, पत्नी अश्विनी, बारा वर्षांचा मुलगा प्रेम, दहा वर्षांची कन्या सिद्धी असा परिवार आहे.