कांदा, बटाट्यासाठी शीतगृह उभारू
By admin | Published: December 6, 2015 10:38 PM2015-12-06T22:38:04+5:302015-12-07T00:29:40+5:30
चंद्रकांत दळवी : म्हासुर्णेत सोसायटी नूतन इमारत
पुसेसावळी : ‘सहकारी संस्थांची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे. सहकारात धाक दाखवून नाही तर मैत्रत्वाच्या व सहकार्यांच्या भावनेतून काम केल्यास संस्थांची प्रगती होते. म्हासुर्णे सोसायटीचा व्यापारी संकुलाचा उपक्रम अभिमानाची बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजलेले आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे. पुसेगावला कांदा, बटाट्यासाठी शीतगृह उभारण्यासाठी प्रयत्न
करणार आहे,’ अशी ग्वाही सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी
दिली.
खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नूतन इमारत व व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, उपसभापती धनाजी पावशे, जितेंद्र पवार, चंद्रकांत पाटील, सुनील माने, सरपंच रोहिणी कदम, उपसरपंच अजित माने, सोसायटीचे अध्यक्ष राजाराम माने, उपाध्यक्ष दादासो सय्यद, राजेंद्र दराडे, डॉ. महेश कदम, जी. के. साळवेकर, दिलीप धरू, प्रीती काळे आदी मान्यवर उपस्थित होते.आ. घार्गे म्हणाले, ‘खटाव तालुक्यात सहकाराची सुरुवात संघर्षातून झालेली आहे. त्यातूनच तालुक्याचा विकास झाला आहे. धान्यतारण योजना व ग्रामीण गोदाम योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शीतगृहाची उभारणी करण्यात येणार आहे.’दिलीप धरू म्हणाले, ‘म्हासुर्णे सोसायटीची व्यापारी संकुल उभारणीची संकल्पना सहकार क्षेत्रातील महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. जनाधार हाच बँकेचा मोठा पुरस्कार आहे. अल्पावधीतच बँकेबरोबर, शेतीची माहिती शेतकऱ्यांना बँकेच्या पोर्टल आॅनलाईन पाहण्यास मिळेल.’मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. सोसायटी सचिव उत्तम सूर्यवंशी जीडीसीए परीक्षेत राज्यात अव्वल आल्याने त्यांचा सत्कार आयुक्त दळवी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी संचालक विलास शिंदे, सुनील घोरपडे, अनिल माने, संतोष घार्गे, नंदकुमार मोरे, संजय जगदाळे, हणमंत देशमुख, दादासो कदम, गोरख माने, अण्णासो माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
कागदोपत्री संस्थांची नोंदणी रद्द!
सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीत सोसायटी व सचिवांचे कार्य महत्त्वाचे आहे. कागदोपत्री अस्तित्वात आहेत व प्रत्यक्षात नाहीत, अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू केले आहे,’ अशी माहिती आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी यावेळी दिली.