अवघ्या चाळीस दिवसातच पुलाची उभारणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:52+5:302021-07-04T04:25:52+5:30
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील पवारवाडी (कुठरे)नजीकच्या वांग नदीवरील पुलाचे बांधकाम अवघ्या चाळीस दिवसात पूर्ण झाले. हा पूल वाहतुकीसाठी खुला ...
ढेबेवाडी : पाटण तालुक्यातील पवारवाडी (कुठरे)नजीकच्या वांग नदीवरील पुलाचे बांधकाम अवघ्या चाळीस दिवसात पूर्ण झाले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने वाल्मिक पठारावरील सुमारे पंधरा गावे आणि वाड्या-वस्त्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे हे काम पूर्णत्वास गेले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाटण तालुक्यातील पहिला पाण्याखाली जाणारा पूल अशी पवारवाडी (कुठरे) फरशीपुलाची ओळख होती. पवारवाडी (कुठरे) येथील वांग नदीवरील हा फरशी पूल पाण्याखाली गेल्यानंतर चौदा गावांचा संपर्क तुटायचा. ही गावे संपर्कहीन होत होती. काही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत असत. बहुतांश ग्रामस्थांची गैरसोय होत होती. राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत या पुलासंदर्भात आवाज उठवला आणि नाबार्ड योजनेतून या पुलासाठी निधी मंजूर करून आणला. अवघ्या दीड महिन्यात या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले.
पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पवारवाडी येथील फरशी पुलाचा भराव आणि काही भाग वाहून जायचा आणि त्याची दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहतूक व एस. टी. बंद असायची. मात्र, आता पूल उभारल्याने ग्रामस्थांचा वनवास संपला आहे.
चौकट
गेल्यावर्षी बारा दिवस पाण्याखाली
गतवर्षी हा पूल तब्बल बारा दिवस पाण्याखाली होता. त्यावेळी पूल पाण्याखाली जाण्यापूर्वी महामंडळाची एस. टी. बस निगडे येथे वाहक-चालकांसह अडकून पडली होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या पुलाची ऊंचीही वाढल्याने वाल्मीक पठारावरील जनतेची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
कोट
पवारवाडी येथील पुलाची उंची कमी असल्याने पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे परिसरातील चौदा गावांमधील लोकांचे प्रचंड हाल होत होते. आता पुलाचे काम झाल्याने वनवास संपला आहे.
- पंजाबराव देसाई,
पंचायत समिती सदस्य, पाटण.
०३ ढेबेवाडी
पाटण तालुक्यातील पवारवाडी कुठरे येथील वांग नदीवर हा पूल अवघ्या चाळीस दिवसात बांधून पूर्ण झाला आहे. (छाया : रवींद्र माने)