बांधकाम साहित्यांची चोरी उघड, दोघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:02 AM2019-04-25T11:02:42+5:302019-04-25T11:03:59+5:30
सातारा येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सातारा : येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.
सागर नागराज गोसावी (वय २२), प्रवीण युवराज घाडगे (रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, लिंबखिंड नागेवाडी येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गोदाममधून अज्ञात चोरट्यांनी दि. २० रोजी साहित्य चोरून नेले होते. त्यामध्ये ट्रक्टर ट्रॉलीसह जनरेटर, सेंट्रिंग प्लेटा असा सुमारे दोन लाखांचा ऐवजाचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी या प्रकरणाचा तपास करत होते.
दरम्यान, सैदापूर येथे वरील दोघे चोरीचे साहित्य विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या दोघांना अटक केली. त्यांनी गोदाममधून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीचा ऐवज त्यांच्याकडून जप्त केला. वरील दोघां संशयितांना सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.