वडूजला मॉड्युलर कंटेनर जम्बो कोरोना रुग्णालयाची उभारणी प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:10+5:302021-07-03T04:24:10+5:30
वडूज : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि इंडो अमेरिकन फाउंडेशनच्या समन्वयातून वडूज येथे खटाव-माण तालुक्यांसाठी शंभर बेडचे मॉड्युलर ...
वडूज : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि इंडो अमेरिकन फाउंडेशनच्या समन्वयातून वडूज येथे खटाव-माण तालुक्यांसाठी शंभर बेडचे मॉड्युलर कंटेनर जम्बो कोरोना रुग्णालय उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे,’ अशी माहिती माहिती माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
वडूज ग्रामीण रुग्णालय परिसरात या हॉस्पिटलच्या कामाच्या पाहणीदरम्यान पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी जर्नादन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, राजीव खेर, विनय अय्यर, उल्का साधलकर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष सुनील गोडसे, नगरसेवक विपुल गोडसे उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्रात पाच ठिकाणी जम्बो कोरोना रुग्णालय ही सेवाभावी संस्था योगदान देत आहे. वडूज, अमरावती, सांगली, जालना व बारामतीमध्ये सध्या प्रत्यक्ष काम सुरू आहे. वडूज येथे सोळाशे चौरस मीटर जागेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज वातानुकूलित हॉस्पिटलमध्ये ८४ ऑक्सिजन आणि १६ आयसीयू बेडची सोय होणार आहे. सेवाभावी संस्था इंडो अमेरिकन फाउंडेशनतर्फे तीन कोटी रुपये खर्चून हे मॉड्युलर कंटेनर जम्बो कोरोना हॉस्पिटलसाठी तर सुमारे एक कोटी हॉस्पिटलच्या जोथापातळीपर्यंत काम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध करून दिला आहे.
देशमुख म्हणाले, ‘संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन, या हॉस्पिटलची उभारणी जलद गतीने करून, ऑगस्ट महिन्यात हे जम्बो कोरोना सेंटर रुग्णसेवेत दाखल होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून वडूज ग्रामीण रुग्णालयालगतच शंभर बेड्सचे सुसज्ज जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, आरोग्य विभागाचे अधिकारी हॉस्पिटलच्या उभारणीवर लक्ष देत आहेत.’
याप्रसंगी बांधकाम विभागाचे शहाजी देसाई, राजेंद्र कुंभार, अक्षय थोरवे, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
संभाव्य त्रुटीबाबत चर्चा...
हे जम्बो कोरोना सेंटर याच ठिकाणी कायमस्वरूपी राहणार असल्याने, पावसाळा व उन्हाळ्यात रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या सोईसुविधाबाबत प्रभाकर देशमुख यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने किचन शेड, डायनिंग हॉल, कर्मचारी, नातेवाईक यांच्यासाठी विश्रांतीगृह आणि मोकळ्या जागेचा सुयोग्य वापर या संदर्भात सखोल चर्चा होऊन, संभाव्य त्रुटीबाबत चर्चा विनिमय झाले.
फोटो : ०२वडूज
वडूज येथील जम्बो कोरोना रुग्णालयाच्या कामाची पाहणी प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी जर्नादन कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांनी केली. (शेखर जाधव)