अवकाळीचे पाणी अडविण्यास सुरुवात; सातारा जिल्ह्यात लोकसहभागातून २८५० वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

By नितीन काळेल | Published: November 28, 2023 06:49 PM2023-11-28T18:49:55+5:302023-11-28T18:50:10+5:30

सातारा : पाणी हे जीवन आहे. पाणीच नसेल तर जीवसृष्टीवर विपरित परिणाम होतो. काहीशी अशीच संकल्पना समोर ठेवत मृद ...

Construction of 2850 Vanrai Bandhara in Satara district through public participation | अवकाळीचे पाणी अडविण्यास सुरुवात; सातारा जिल्ह्यात लोकसहभागातून २८५० वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

अवकाळीचे पाणी अडविण्यास सुरुवात; सातारा जिल्ह्यात लोकसहभागातून २८५० वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

सातारा : पाणी हे जीवन आहे. पाणीच नसेल तर जीवसृष्टीवर विपरित परिणाम होतो. काहीशी अशीच संकल्पना समोर ठेवत मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही दि. २९, ३० रोजी मोहीम राबविण्यात येणार असून २ हजार ८५० बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांसह संस्थांचा सहभाग राहणार आहे.

राज्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्यात. पाऊस नसल्यानेच अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व लक्षात येते. या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी प्रती गाव पाच वनराई बंधारे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्णही करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व गावांत बुधवार आणि गुरुवारी ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. तसेच जिल्हा परिषद, हायस्कूल, खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्याऱ्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कंपनी, सहकारी संस्था, कारखाने आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधारे बांधले जाणार आहेत.

त्यामुळे दोन दिवसांत अधिकाधिक बंधारे निर्मितीसाठी पावले उचलली जात आहेत. यामुळे सध्या अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी नाही. पण, अवकाळी पाऊस चांगला झाल्यास पाणी अडवणूक होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या बंधाऱ्यामुळे भविष्यातही पाणी साठून राहण्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविणे आणि त्याचा फायदा करुन घेणे अशीच ही संकल्पना आहे. 

जमिनीची पाणीपातळी वाढणार

जिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखली राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यात २८५० वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे बंधारे ओढ्यावर बांधले जाणार असल्याने अवकाळीचा पाऊस झाल्यास वाहून जाणारे पाणी अडले जाणार आहे. यामुळे जमिनीची पाणीपातळीही वाढणार आहे. यामध्ये ग्रामस्थ, संस्थाचा सहभाग घेऊन संकल्पना यशस्वी करण्यात येईल.

Web Title: Construction of 2850 Vanrai Bandhara in Satara district through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.