सेव्हन स्टार मल्टिप्लेक्सचे बांधकाम बेकायदा : शेंडे
By admin | Published: February 2, 2015 10:00 PM2015-02-02T22:00:58+5:302015-02-02T23:49:03+5:30
त्यावेळी इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने दि. ११ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते.
सातारा : ‘येथील बसस्थानक परिसरात एमएसआरटीसीच्या माध्यमातून ‘बीओटी’ तत्त्वावर कमर्शियल इमारत ‘सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स’ या नावाने महाराजा प्रमोटर्स बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स (महेंद्र चव्हाण) हे बांधत आहेत. या इमारतीची जागा ही सत्ता प्रकार ‘ब’ आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा काही अटींवर दि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्टला दिली आहे. या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून ही इमारत बांधली जात आहे. हे बांधकाम बेकायदा आहे,’ असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.यासंबंधी आपण आतापर्यंत कोणाकोणाशी पत्रव्यवहार केला याची कागदपत्रे दाखवून शेंडे म्हणाले, ‘या इमारतीबाबत पालिकेतून माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली होती. त्यावेळी इमारतीचे बांधकाम बेकायदा आहे, हे लक्षात आले. त्या अनुषंगाने दि. ११ जून २०१४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली. त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, त्यावर गेल्या सहा महिन्यांत काहीही कार्यवाही झालेली नाही. तसेच दि. २७ जून २०१४ रोजी दि बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट आणि मुख्यमंत्री, नगरपालिका मुख्याधिकारी व इतरांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. त्यावरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता लोकशाही दिनात अर्ज दाखल केला आहे. शहरात अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांच्या टपऱ्या काढून पर्यायी व्यवस्था न करता त्यांना रस्त्यावर आणले जात आहे. परंतु, धनदांडग्यांचे बेकायदा बांधकाम मात्र अनेकदा तक्रारी करूनही काढले जात नाही, हे दुर्दैवी आहे. म्हणूनच संबंधित बांधकाम बेकायदा असल्याचे निदर्शनास आणूनही पालिका, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व शासनानेही दखल घेतली नाही.’ (प्रतिनिधी)
बंदोबस्तात अतिक्रमण काढणार : शिवेंद्रसिंहराजे
‘सातारा शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी शहरातील अतिक्रमणे हटविली जात आहेत. रविवार पेठेतून या मोहिमेला विरोध आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात तेथील अतिक्रमणे काढावीत,अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत,’ अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘सातारा शहरात तलाठ्यांसाठी सुसज्ज भवन नाही, त्यांची समस्या लक्षात घेऊन पोवई नाक्यावरच तलाठी भवन उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविला असून, पाठपुरावा करत आहे.’
या जागेची मूळ मालकी एसटी महामंडळाची असून, शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच आराखडा मंजूर करून घेऊन बांधकाम केले आहे. शेंडे यांनी सूडबुद्धीतून आरोप केले आहेत.
- महेंद्र चव्हाण, आर्किटेक्ट