‘तमाशा’ टाळून शिवस्मारकाची उभारणी
By admin | Published: March 2, 2015 09:46 PM2015-03-02T21:46:12+5:302015-03-03T00:35:12+5:30
कण्हेरीत उपक्रम : यात्रेतील कार्यक्रमांना फाटा दिला
खंडाळा : कण्हेरी, ता. खंडाळा या गावाने यात्रेतील पारंपरिक तमाशा व इतर कार्यक्रमांना फाटा देऊन त्यावरील होणाऱ्या खर्चातून गावात तरुणांना प्रेरणादायी ठरेल, असे शिवस्मारक उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले असून, सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श त्यांना ठेवला आहे.खंडाळा तालुक्यातही अशा यात्रांना प्रारंभ झाला आहे. यात्रा म्हटलं की, तमाशा-कुस्त्यांचे फड गावोगावी रंगतात. लाखो रुपयांचा खर्च तमाशा व मनोरंजनात्मक कार्यक्रमावर केला जातो. मात्र,
कण्हेरी हे गाव तसे पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. या गावात हिंदू-मुस्लीम यासह विविध जातीधर्माचे लोक राहतात. तसेच राजकीय, सामाजिक परिस्थितीतून अनेक तरुण मंडळेही तयार झाली होती. मात्र, छत्रपती शिवरायांच्या नावाखाली सर्वांनी एकत्र काम करणार आहेत. सर्व मंडळे बरखास्त करून श्री शिवराय सर्वांगीण विकास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याच माध्यमातून गावात यापुढे सर्वधर्मीय, कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला असल्याचे सरपंच विजय चव्हाण यांनी सांगितले.
गावचा सर्वांगीण विकास साधून आदर्श गाव निर्मितीचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, वनराई बंधारे, ग्रामस्वच्छता, संपूर्ण शौचालये वापर, सांडपाणी व्यवस्थापन या कामांनाही गती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
तांब्याची जुनी भांडी केली जमा
गावातील सर्वधर्मीय तरुणांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. पूर्वी गावात अलसेल्या शिवपुतळ्याच्या जागी उत्तम दर्जाचे शिवस्मारक उभारण्याचा सर्वांनी संकल्प केला आहे. त्यासाठी तरुणांनी गावातून जुनी तांब्याची भांडी जमा केली आहेत. त्यापासून मूर्ती घडविणार आहोत. एकोप्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होणार आहे, असे कण्हेरीचे सरपंच विजय चव्हाण यांनी सांगितले.