सातारा जिल्ह्यात प्रथमच दोन वन उद्यानांची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:13 PM2018-07-22T23:13:30+5:302018-07-22T23:13:44+5:30
खंडाळा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे..’ संतांच्या या उक्तीप्रमाणे भावी पिढीला सुरक्षित आणि संपन्न वृक्ष प्रजातींचा ठेवा देण्यासाठी राज्य सरकारच्या वन खात्याने उपवनांची निर्मिती करून वन उद्याने उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील गुरेघर या दोन ठिकाणी वन उद्यानांची निर्मिती केली जाणार असल्याने हा परिसर आता नंदनवन बनणार आहे.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी या पद्धतीने ३४ जिल्ह्यांत ६८ वन उद्यानांची निर्मिती वनविभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या वनांना ‘दिवंगत उत्तमराव पाटील वन उद्यान’ या नावाने संबोधले जाणार आहे. राज्यातील या उपवनांमधून फळवन, चंपकवन, कदंबवन, अशोकवन, आम्रवन, जंबुवन, वंशवन, मदन वृक्षवन, चरक वन, लतावन, सारिकावन, मगृसंचार वन, अतितिवन यासारखी विविध प्रकारची वने साकारली जात आहेत. यामध्ये प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्षारोपण करून उद्यानांमधून स्मृतिवने निर्माण केली जात आहेत. निरनिराळ्या वृक्ष प्रजातींचे समूह निर्माण करण्याबरोबरच दुर्मीळ, औषधी आणि सुंदर वृक्ष प्रजातींचे जतन आणि संवर्धन होणार आहे. शहरांमधील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रजाती व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे, यासाठी या उद्यानात अभ्यासाबरोबर क्रीडा, व्यायाम आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
आता वन्यजीवांचा अभ्यास सोयीचा..
सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील गुरेघर या दोन ठिकाणी अशा वन उद्यानांची निर्मिती होणार असल्याने आता विविध वृक्ष प्रजाती व वन्यजीवांचा अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.
संग्रहालय साकारणार
या वन उद्यानांमध्ये वृक्ष-लतांचे महत्त्व आणि उपयोगिता यांची माहिती मिळावी, यासाठी पुस्तक संग्रहालय निर्माण करण्याचे व त्याद्वारे या सर्व माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे नियोजित आहे.