बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:16+5:302021-03-01T04:47:16+5:30
---------------- वाळू उपसा सुरूच सातारा : जिल्ह्यात वाळूचा उपसा करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही ग्रामीण भागात चोरून वाळू उपसा ...
----------------
वाळू उपसा सुरूच
सातारा : जिल्ह्यात वाळूचा उपसा करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही ग्रामीण भागात चोरून वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. ही वाहतूक रात्रीच्या वेळी केली जात असल्याने संबंधित विभागाने सापळा रचून कारवाई करणे गरजेचे आहे.
--------------------सांडपाणी रस्त्यावर
सातारा : सातारा शहरात अनेक भागात सांडपाण्यासाठी भुयारी गटार योजना राबविलेली आहे. मात्र, उर्वरित भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी दुर्गंधी सुटते. त्यामुळे पालिकेने संबंधित गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
-----------------------
ज्वारीचे पीक जोमात
सातारा : तालुक्यातील ग्रामीण भागात यंदा चांगला पाऊस झाला होता, तसेच थंडीही अधूनमधून पडत आहे. त्यामुळे ज्वारीचे पीक जोमात आहे. कणसं चांगली भरली आहेत. साहजिकच गावोगावी हुरडा पार्टीचे बेत आखले जात आहेत. यासाठी मित्र कंपनी, पै-पाहुण्यांना बोलावले जात आहे.
--------------------घाटात दुर्घटनांत वाढ
सातारा : अनेक ठिकाणी घाट असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. काही ठिकाणी अतिशय तीव्र वळण असल्याने वाहने वळविताना अडचणींचा सामना करावा लागतो. वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. घाटातील रस्ते रुंद करावेत, अशी मागणी केली जात आहे.
-----------------
प्रवासाला विलंब
सातारा : सातारा-फलटण मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवासाला विलंब होत आहे. सातारा ते फलटण या एक ते सव्वा तासाच्या अंतरासाठी दीड-पावणेदोन तास लागत आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
------------------
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
शिरवळ : शेती पंपासाठी वीज वितरण कंपनीने सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
-----------------------
राजवाडा चकाचक
सातारा : राजवाडा परिसरात गोलबागेभोवती डांबरीकरण केले आहे. त्यामुळे हा परिसर चकाचक झाला आहे. या ठिकाणाहून वाहने सुसाट धावत आहेत. मंगळवार तळे, राजधानी टॉवर परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
--------------
दवाखान्यात गर्दी
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये थंडीची लाट आली होती. त्यामुळे आजारी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या रांगा लागत होत्या. कोरोनाचा धोका कायम असल्याने रुग्णांची अगोदर नाव नोंदणी करून वेळ निश्चित सांगितली जात होती.
-----------------
पंक्चरच्या प्रमाणात वाढ
सातारा : साताऱ्यात उन्हाचा तडाका वाढू लागला आहे. त्याचा दुचाकीला फटका बसत आहे. गाड्यांचे जुने पंक्चर उचकटत असल्याने पंक्चरच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
--------------------
पाठदुखीचा त्रास
सातारा : साताऱ्यातील शाहुपुरीसह आंबेदरे मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून वाहने नेणे जिकिरीचे होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना पाठदुखीच्या व्याधी जडू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे वाहनांचे सुटे भाग नादुरुस्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दुचाकीचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
------------------राजभाषा दिन साजरा
सातारा : मराठी राजभाषा दिन साताऱ्यातील शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ज्या शाळेत विद्यार्थी येतात तेथे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही मुलांनी मराठीतील कवितांचे वाचन केले. ज्या ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरू आहेत तेथेही ऑनलाइन पद्धतीने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.