प्रशासनाकडून आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:41 AM2021-04-23T04:41:44+5:302021-04-23T04:41:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णाचा लवकर शोध लागून संसर्ग कमी करण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व प्रांताधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये बहुतांश गावांमध्ये कोरोनाबाधित आढळून येतात. बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान ३० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे गरजेचे आहे. जेणेकरून संपर्कातील व्यक्तींची वेळेत निश्चिती होऊन कोविड चाचणी करणे, विलगीकरण करणे, उपचार करणे इत्यादी बाबी नियंत्रित करून कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल; परंतु बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग प्रभावीपणे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
गाव स्तरावरील प्राथमिक शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांच्या साहाय्याने बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान ३० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात यावे, याकामी संबंधितांना उपविभागीय अधिकारी यांनी लेखी आदेश काढलेले आहेत. तसेच बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी राबवण्याची कार्यपद्धती करून देण्यात आलेली आहे. बाधित रुग्णांची यादी घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध या माध्यमातून घेण्यात येणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबत आवश्यक ते सर्व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामात कोणतीही हयगय केल्यास अथवा आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
यांच्यावर आहे जबाबदारी
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य सेवक
हाय रिस्क संपर्कातील व्यक्ती म्हणजे कोण
- रुग्णाच्या फिजिकल कॉन्टॅक्टमधील व्यक्ती, घरातील व्यक्ती
- रुग्णाच्या कोणत्याही स्तरावर संबंध आलेल्या व्यक्ती
रुग्णाची कपडे, भांडी धुतलेल्या व्यक्ती
- रुग्णाच्या तीन फूट अंतरावरील संपर्क असलेल्या व्यक्ती
- रुग्णासमवेत प्रवास केलेल्या व्यक्ती
- लो रिस्क संपर्कातील व्यक्ती
- बाधित रुग्णाबरोबर लांबच्या अंतरातील परंतु एकाच खोलीमध्ये काम केलेल्या व्यक्ती
- एकाच प्रवासाच्या साधनांमधून उदाहरणार्थ बस, ट्रेन, विमान इत्यादी प्रवास केलेल्या व्यक्ती
कोट..
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. केवळ आरोग्य विभागावर अवलंबून न राहता शासनाच्या सर्व यंत्रणांना सजग करून त्यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा लवकरात लवकर शोध लागून त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत या हेतूने कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग मोहीम सुरू केली आहे.
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा