शेद्रे येथील उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळला, चालक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 07:22 PM2019-05-18T19:22:23+5:302019-05-18T19:23:07+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून कंटेनर २५ फुटावरून सेवारस्त्यावर कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातावेळी सेवा रेस्त्यावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.
शेंद्रे : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने उड्डानपुलावरून कंटेनर २५ फुटावरून सेवारस्त्यावर कोसळला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या अपघातावेळी सेवा रेस्त्यावर वाहतूक नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा अपघात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास झाला.
मच्छिंद्र आबासाहेब चितळे (वय २४, रा. धनगरवाडी चेकेवाडा, माणिक दौंडी, जि. अहमदनगर) असे जखमी चालकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चालक मच्छिंद्र चितळे हा एकटाच कंटेनर घेऊन कोल्हापूरहून पुण्याकडे निघाला होता. शेंद्रे येथील उड्डानपुलावर आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर पुलाचा संरक्षक कठडा तोडून सुमारे २५ फुटावरून सेवा रस्त्यावर कोसळला.
यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी आवाजाच्या दिशेने घटनास्थळी धाव घेतली. सेवा रस्त्यावर कंटेनरखाली कोणी सापडले आहे का, याची नागरिकांनी खातरजमा केली. मात्र, कोणीही नसल्याचे पाहून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. उड्डाणपुलावरून कंटेनर कोसळल्याने कंटेनरचा अक्षरश: चक्काचूर झाला.
सेवा रस्त्यावर लोकवस्ती असून, या ठिकाणी नेहमी रहदारी सुरू असते. मात्र, या अपघातावेळी सेवा रस्त्यावर रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी कंटेनर चालकाला बाहेर काढून त्याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविले.