दूषित पाणी माशांच्या जीवावर - धोम धरण : दहा किलोचा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:42 PM2018-06-06T22:42:20+5:302018-06-06T22:42:20+5:30
धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
पांडुरंग भिलारे ।
वाई : धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे. धरणात पाणीच शिल्लक नसल्याने उर्वरित पाण्यातूनच पर्यटक रपेट मारण्यासाठी बोटिंग करतात, त्यामुळे पाणी गढूळ होऊन आत असणाºया माशांचा जीव जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता बोटिंग क्लबजवळ दहा ते पंधरा किलोचा मासा मृतावस्थेत धरणाच्या किनाºयावर वाहत आला. त्याला प्रचंड दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने मृत पावून दोन-तीन दिवसांचा कालावधी झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे अनेक मासे मृतावस्थेत त्या पाण्यात असण्याची शक्यता आहे. परंतु धोम पाटबंधारे खात्याच्या गलथानपणामुळे पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहण्यास अडचण येत आहे.
बेसुमार कालव्यात पाणी सोडल्याने धोम धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यातच धरणात प्रचंड प्रमाणात गाळ साठल्याने किती पाणी शिल्लक आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे धरणातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र सध्या धरण परिसरात पाहावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत असल्याने मासेमारी करणारा ठेकेदार वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मासेमारी करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मासे मृत पावण्याचे प्रमाण वाढले आहे. जरी मासे पाण्याबाहेर काढल्यास मारून जातात तरीही ते मरणे नैसर्गिक असावे, प्रयोग करून मासे मारण्यात येऊ नयेत. तरी संबंधित विभागाने खासगी बोटिंग क्लबला त्या संदर्भात सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
पाणीपुरवठ्याचीही चिंता..
मृत झालेले मासे बाजारात विक्रीसाठी आल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘निपाह’सारख्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. सध्या धरण परिसरात पाण्याला विशिष्ट असा दुर्गंध येत असून, पर्यटक नाक मुरडताना दिसत आहेत. धोम धरणाच्या पाण्यावर लाखो लोकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा योजना आहेत. गावांना मिळणारे पाणी दूषित मिळाल्यास संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन विविध प्रकारच्या रोगांना निमंत्रण मिळू शकते.
धोम धरणाच्या जलाशयात दहा किलोचा मासा मृतावस्थेत आढळून आला.