उत्तरमांड धरणातील पाणी दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:38+5:302021-03-04T05:12:38+5:30
चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे ...
चाफळच्या पश्चिमेस एक किलोमीटर अंतरावर गमेवाडी गावाजवळ उत्तरमांड नदीवर धरणाची उभारणी करण्यात आली आहे. या धरणामुळे चाफळपासून चरेगावपर्यंत शेतीचे नंदनवन झाले आहे. त्यातच या परिसरात गर्द झाडीमुळे विभागातील अनेक जण या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला येत असतात. तर धरणाच्या बाजूनेच पाडळोशी विभागाला जोडणारा मुख्य रस्ता गेला असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. शिवाय सकाळी शुद्ध हवा मिळावी म्हणून या ठिकाणी तरुणांसह ग्रामस्थ व्यायामासाठी येतात. मात्र, विभागातील काही शेतकरी या ठिकाणी आपली मृत जनावरे धरण परिसरात आणून उघड्यावरच टाकत आहेत. हा कहर झाला असतानाच आता चक्क धरणाच्या पाण्यातच मृत गाय टाकल्याने धरणातील पाणी दूषित झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. अगोदरच कोरोनाचे जाळे पसरत आहे. त्यातच या उघड्यावर टाकलेल्या मृत जनावरांच्या दुर्गंधीने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्याचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.