‘डीजे’चा आवाज वाढव स्पर्धा भोवल्या; कोयता, तलवारीही नाचविल्या, सहा जणांना अटक
By दत्ता यादव | Published: November 30, 2023 09:59 PM2023-11-30T21:59:33+5:302023-11-30T22:01:45+5:30
तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली. पाहता पाहता दोघांनीही डीजे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आणला.
सातारा: तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली. पाहता पाहता दोघांनीही डीजे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आणला. हाैसे, नवसे, गाैसेही खुन्नसची स्पर्धा पाहण्यासाठी जमा झाले. कानठळ्या बसणारा आवाज करत ही र्स्पधा आटोपती घेऊन पोलिसांच्या भीतीने त्यांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच धरपकड करून सहाजणांना अटक केली. ही घटना लिंब, ता. सातारा येथे रात्री साडेसात वाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, दोन डीजेच्या मालकांमध्ये काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध झाले. तुझा डीजे खणाणतो की माझा, यावरून दोघांमध्ये मेसेजवरून चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर प्रत्यक्षात समोरासमोर येऊन डीजे वाजविण्याचे एकमेकांना आव्हान देण्यात आले. हे आव्हान दोघाही डीजे मालकांनी स्वीकारले. या आवाजावर ताल धरणाऱ्या आपापल्या समर्थकांना त्यांनी मेसेज करून या अनोख्या स्पर्धेची वेळ ठरवली. बुधवार, दि. २९ रोजी रात्री साडेसातला दोन्ही डीजे गाैरीशंकर काॅलेजच्या परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर आले.
बघ्यांचीही अक्षरश: तुडुंब गर्दी झाली. डीजेचा आवाज दणाणू लागला. तरुण बेधुंद होऊन नाचू लागले. एवढेच नव्हे तर काही तरुण डीजेच्या वाहनावरील टपावर जाऊन नाचू लागले. महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालक व प्रवाशांना कानावर हात ठेवून तेथून जावे लागले. सुमारे अर्धा तास हा धुडगूस सुरू होता. कोणीतरी या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांना टीप मिळाल्याचे समजताच काही वेळातच सगळे चंबूगबाळे उचलून दोन्ही डीजे मालक गायब झाले. मात्र, पोलिसांनी रात्रभर धरपकड करून सहाजणांना अटक केली. तर एकूण ३३ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घातक शस्त्र जप्त..
हातात कोयता, तलवार घेऊन काही तरुण वाहनाच्या टपावर नाचत होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सातारा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित सहा तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली असून, न्यायालयाने त्यांना सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
अटकेतील संशयित..
राजमुद्रा डाॅल्बी चालक, मालक, साथीदार अनिकेत भालचंद्र उंबरे (२१), प्रणव गजानन उंबरे (२०, दोघेही रा. कोडोली, ता. सातारा), प्रतीक दशरथ भालेकर (२९, रा. जैतापूर, ता. सातारा) तसेच ए. पी. आउटलाईन डाॅल्बीचे चालक, मालक व साथीदार अभिषेक रवींद्र चव्हाण (२८), प्रतीक दत्तात्रय चव्हाण (२८), आदेश महादेव शिर्के (१८, रा. म्हसवे, ता. जावळी, जि. सातारा), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.