नागठाणे परिसरात पावसाची संततधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:04+5:302021-07-24T04:23:04+5:30
नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) परिसरात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण नागठाणे परिसरात ...
नागठाणे : नागठाणे (ता. सातारा) परिसरात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण नागठाणे परिसरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्याने भागातील बळीराजा पिकांच्या चांगल्याच चिंतेत पडला आहे.
संपूर्ण नागठाणे परिसरातील काशीळ, निसराळे, खोडद, अतीत, माजगाव, नागठाणे, निनाम, पाडळी, मांडवे, सोनापूर, बोरगाव, भरतगाव तसेच वळसे आदी गावांसाठी वरदान असलेल्या उरमोडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू केला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागठाणे परिसरातील काही गावांमध्ये मागील दोन आठवड्यांमध्ये पावसाची थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली होती. त्यावेळी योग्य प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने भागातील बळीराजा मनोमन सुखावला होता. परंतु मागील दोन दिवसांपासून संपूर्ण नागठाणे परिसरात अतिवृष्टी होत असून, पाऊस थांबण्याची चिन्हेच दिसत नसल्याने पेरणी झालेल्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पीक उत्पादनाच्या दृष्टीने बळीराजाच्या पदरी घोर निराशाच पडण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील गावांच्या बाजूने असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे पाणी साचत असल्यामुळे वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. उरमोडी नदीच्या बाजूच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच येणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.