शिवथर परिसरात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:40+5:302021-07-23T04:23:40+5:30
शिवथर : परिसरात बुधवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शिवथर तसेच परिसरात सर्व ओढे, नाले तसेच नदीला पूरस्थिती निर्माण ...
शिवथर : परिसरात बुधवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शिवथर तसेच परिसरात सर्व ओढे, नाले तसेच नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. शेतामध्ये सरीमध्ये पाणी साठले होते. रात्रभर झालेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला होता.
शिवथर, आरफळ, मालगाव, वडूथ, रेवडी, अंबवडे या परिसरांत बुधवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्याचबरोबर बुधवारी रात्रभर या पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे सोयाबीन, घेवडा यासारख्या खरीप पिकांबरोबर ऊस, हळद यांनासुद्धा चांगला फायदा होणार आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे लिंब-गोवे येथील कोटेश्वर मंदिर व वडूथ येथील शकुंतलेश्वर या मंदिरांना पाण्याचा वेढा पडला होता. त्याचबरोबर रेवडी येथील वसना नदीचा पूलदेखील पाण्याखाली गेला होता. या पडलेल्या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला आहे. शेतीची आंतरमशागतीची कामे उरकल्याने शेतकरीवर्गाचे पावसाकडे लक्ष लागले होते.