कोरोनामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायमस्वरूपी घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:46+5:302021-05-25T04:44:46+5:30
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात गेल्या वर्षभरापासून कंत्राटी स्वरूपात अनेकजण कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय ...
सातारा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात गेल्या वर्षभरापासून कंत्राटी स्वरूपात अनेकजण कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून कोरोना विभाग तसेच विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये कंत्राटी तत्त्वावर अनेकजण कार्यरत आहेत. हे कंत्राटी योद्धे अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. आपल्या कुटुंबीयांना सोडून कोरोना विभाग आणि विलगीकरण कक्षात त्यांचे काम सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कोरोना संकट कमी होण्यास मदत झालेली आहे; पण कोरोना अंतर्गत भरती ही तात्पुरत्या स्वरूपातील आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेतून काढण्याचे नियोजन आहे. यामुळे सर्वजण बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे.
कोरोना काळात हे कंत्राटी कर्मचारी करत असलेले काम विचारात घेण्याची गरज आहे. त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, ही अपेक्षा आहे. त्यातच विविध साथीचे रोग सुरू असतात. २००७ पासून झिरो बजेटमुळे भरती नाही. परंतु, आजारांच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्यासाठी नोकर भरतीचा निर्णय अभिनंदनीयच आहे; पण कंत्राटी स्वरूपातील कोरोना योद्ध्यांना कायम सेवेत घ्यावे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा आहे.
निवेदन देताना कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष सोहेल पठाण, उपाध्यक्ष विराज शेटे, सहसंघटन प्रमुख सुनील जाधव, महिला अभियान प्रमुख गौरी भोसले, राज्य कार्यकारिणीचे सहसंघटन प्रमुख श्रीनिक काळे, आदी उपस्थित होते.
....................................................