ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे?

By admin | Published: November 16, 2016 12:15 AM2016-11-16T00:15:04+5:302016-11-16T00:15:04+5:30

वेदांतिकाराजे भोसले : भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागले..?

Contracting, bullying, fraud? | ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे?

ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे?

Next

सातारा : ‘गेली दहा-बारा वर्षे मी समाजकार्यात आहे. मी नगरपालिकेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान करू शकते; पण केवळ आमदाराची बायको म्हणून मी नगराध्यक्ष व्हायचे नाही? रंजना रावत यांच्याबाबतीत तुम्ही काय केले? का तुम्ही निवडून आलेल्या लोकांना असे वागवता? पारंपरिक ठेकेदारी, गुंडगिरी, हप्तेखोरी कोणामुळे चालते? शहरात कोणाची दहशत आहे? भर सभागृहात उमेदवारांना का रडावे लागते? यालाच प्रेम आणि जिव्हाळा म्हणायचा का?,’ असा खडा सवाल नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांनी केला.
प्रभाग ५ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ गोडोली येथे झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ‘नविआ’चे उमेदवार शेखर ऊर्फ आण्णासाहेब मोरे-पाटील,
मनीषा काळोखे, भरतदादा सपकाळ, पंडितराव मोरे, वामनराव म्हस्के, सजन कुडाळकर, अरुण मापारी, मधुकर कुंभार, बाळासाहेब माने, अण्णासाहेब साळुंखे, भाई जगताप, लक्ष्मण मोरे-पाटील, व्यंकटराव मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अपप्रवृत्तींच्या विरोधात जात-पात, धर्म बाजूला ठेवून संपूर्ण गाव एकवटला असून, ही एकी कायम ठेवा, असे आवाहन करून वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘गेली दहा वर्षे तुम्ही वकिली थाट अनुभवला; पण दहा वर्षांत गोडोलीकरांना पाणी मिळाले नाही, ही खरी शोकांतिका आहे. पालिकेला एक सक्षम, कार्यक्षम अध्यक्ष आणि काम करणारे नगरसेवक पाहिजेत. ही काळाची गरज आहे. मनोमिलन होणार अशी
आमची अपेक्षा होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे स्वत:हून दादांना नगराध्यक्षपद देत होते; पण चर्चाच नाही तर, मग कालवण कसे होणार? मनोमिलन का तुटले, हे आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, असे वेदांतिकाराजे म्हणाल्या.
काम कोण करतंय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. सातारा शहराचा विकास साधण्यासाठी प्रशासनावर नियंत्रण ठेवणारा, कामकाजात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणारा नगराध्यक्ष हवा आहे. तुम्हाला वाटेल तसे मान डोलावणारा नगराध्यक्ष देऊन सातारा शहराचे आणि नागरिकांचे नुकसान करायचे का?,’ असा परखड सवाल वेदांतिकाराजे यांनी उपस्थित केला.
देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भरत संकपाळ, उमेदवार काळोखे, शेखर मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभागातील अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन नगरविकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
कोणावरही आरोप करणार नाही...
‘मी कोणावरही आरोप करणार नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. मी फक्त विकासाच्या, कामाच्या आणि सक्षमतेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून, मला सातारा शहराचा विकास साध्य करायचा आहे,’ असेही वेदांतिकाराजे म्हणाल्या.
 

Web Title: Contracting, bullying, fraud?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.