नेत्यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदारांची मनमानी

By admin | Published: August 3, 2015 09:52 PM2015-08-03T21:52:37+5:302015-08-03T21:52:37+5:30

चाफळ विभागातील स्थिती : रस्ते अन् शासकीय इमारतींच्या कामाचा ढासळला दर्जा

Contractors' arbitrariness due to the superiority of leaders | नेत्यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदारांची मनमानी

नेत्यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदारांची मनमानी

Next

चाफळ : निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेला शासनाचा बांधकाम विभाग ही चाफळ विभागाच्या विकास प्रक्रियेतील डोकेदुखी ठरली आहे. कोट्यवधींचा निधी येऊनही सर्वसामान्यांपर्यंत विकास पोहोचत नसल्याचे चित्र आहे. राजकारणी आणि ठेकेदार यांची आर्थिक जवळीक घट्ट झाल्याने शासनाचा लाखोंचा निधी पाण्यात जात असल्याचे दिसते.राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या चाफळ विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता विभागातील बहुंताश गावे डोंगर कपारीमध्ये वसलेली आहेत. विभागात दोन परस्पर कट्टरविरोधी गट कार्यक्षम आहेत. विभागाची सत्ता सूत्रेही दोन गटांमध्ये विभागली गेली आहेत. पूर्वी या विभागात माजी आमदार विक्रमसिंंह पाटणकर गटाचा तब्बल तीस वर्षे वरचष्मा होता. मात्र, गत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विभागातील मतदारांनी सत्तास्थाने बदलून पंचायत समिती पाटणकर गटाकडे तर जिल्हा परिषद सदस्यपद आमदार देसाई गटाकडे सुपूर्द केले आहे. सध्या हे सदस्य विभागातील आपापल्या गटाच्या ताब्यात असणाऱ्या गावांमध्ये विकासकामे करून आपला गट अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे करीत असताना कामाच्या दर्जाकडे मात्र ते दुर्लक्ष करतात.विभागाचा विकास करण्याच्या घोषणा अनेकदा, अनेकांनी केल्या. राम मंदिरामुळे नावारूपास आलेला हा विभाग जगाच्या नकाशावर घेऊन जाण्याच्या वल्गनाही करण्यात आल्या. मात्र, आजही कित्येक गावांना ये-जा करण्यास साधे रस्ते नाहीत. ही या विभागाची खरी शोकांतिका आहे. ज्या गावांना रस्ते आहेत, त्यांची अवस्था दयनीय होऊन बसली आहे. काही ठिकाणी तर निधीअभावी रस्त्यांची कामे अर्ध्यावरच पडून राहिली आहेत.
ज्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली त्याच्या दर्जाकडे कोणीही लक्ष दिले नाही. परिणामी, सहा महिन्यांतच काही रस्ते उखडले. तरीही याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. काही ठेकेदार दुसऱ्या संस्थेच्या नावावर राजकारण्यांना व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामे करीत आहेत. राजकारण्यांचे लागेबांधे असल्याने ठेकेदाराला कोणीही कामाच्या दर्जाबाबत विचारणा करीत नाही. काम पूर्ण झाल्याचे दाखविण्याचा सर्वांचा खटाटोप असतो. त्यामुळे अनेक रस्ते, शासकीय इमारतींची कामे निकृष्ट झाल्याचे दिसते. (वार्ताहर)

Web Title: Contractors' arbitrariness due to the superiority of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.