महाराष्ट्रात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे
By admin | Published: January 13, 2016 12:22 AM2016-01-13T00:22:35+5:302016-01-13T00:22:35+5:30
हुमगावात स्मृतिदिन सोहळा : कर्तृत्ववान व्यक्तींचा शिंदेशाही पगडी देऊन गौरव
सातारा : ‘छत्रपती शिवराय तसेच शंभूराजे ते दत्ताजीराव शिंदेपर्यंत असलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडे रोवले. मात्र, खोटारड्या इतिहासकारांनी हा इतिहास समाजापासून नेहमी दूर ठेवले आहे,’ असे मत इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
ते हुमगाव येथे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांच्या २५५ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, किसनशेठ शिंदे, पंचायत समिती सदस्य मोहनराव शिंदे, चंदन शिंदे, वैशाली शिंदे, भीमसिंह शिंदे, प्रमोद शिंदे, सुभाष शिंदे, सुदाम शिंदे मान्यवर उपस्थित होते.
कोकाटे म्हणाले, ‘केंद्र शासनाच्या राज्य व लोकसेवा आयोगाच्या परीक्ष्ोत पेशव्यांचाच इतिहास का विचारला जातो? मराठ्यांचा का विचारला जात नाही? इतिहासात मराठ्यांचा इतिहास अजरामर करणारे रणबहाद्दर दत्ताजीराव शिंदे यांचा पराक्रम पेशव्यांपेक्षा किती तरी मोठा आहे. मराठ्यांनी इतिहास घडविला, तो कधीच लिहिला नाही आणि जो लिहिला तो दिशाभूल करणारा आहे.’
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘इतिहासात छत्रपती शिवरायांच्या घराण्याबरोबर निष्ठावंत व बरोबरीने सहकार्य करणारे शिंदे घराण्याने स्वराज्य निर्माण करण्यासाठी शौर्याने छत्रपतींना साथ दिली. छत्रपती शिवरायांनी शिंदे घराणे एकनिष्ठ होते.’
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांच्या काळापासून शिंदे सरकार घराण्यांने स्वराज्यास साथ देऊन घराण्याचा नावलौकिक केला आहे.’
प्रारंभी महामार्गावर शिंदे घराण्यातील युवकांनी मोठी रॅली काढली. या कार्यक्रमात शिंदे घराण्यातील विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)