बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी कंट्रोल रूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:51+5:302021-04-22T04:39:51+5:30
फलटण : सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, आगामी काळामध्ये कोरोना रुग्णांची तपशीलवार माहिती मिळण्यासाठी व कोरोनाबाधित ...
फलटण : सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, आगामी काळामध्ये कोरोना रुग्णांची तपशीलवार माहिती मिळण्यासाठी व कोरोनाबाधित रुग्णांना व नातेवाईकांना सहकार्य करण्यासाठी फलटण पंचायत समिती येथे कोरोना कंट्रोल रूम तातडीने तयार करण्यात यावी,’ असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिले.
फलटण तालुक्यातील कोरोना आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली फलटण पंचायत समितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सभापती शिवरुपराजे खर्डेकर, उपसभापती रेखा खरात, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, सहायक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाबाबतीत असलेली रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीआर चाचणी करणे गरजेचे नाही. तरी फलटणमध्ये रॅपिड टेस्ट न करता आरटीपीआर चाचण्यांवर भर द्यावा व आगामी काळामध्ये फलटण तालुक्यामधून कोरोना कसा हद्दपार करता येईल, याबाबत सुक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन विनय गौडा यांनी केले. फलटण तालुक्यामध्ये कोरोनाची चाचणी करताना संबंधित रुग्णांचा मोबाईल नंबर हा घेणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सुलभ होईल. यासोबतच फलटण तालुक्यामध्ये आरटीपीसीआर टेस्ट या वाढविणे गरजेचे आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णाला योग्य ते लक्ष ठेवून त्यांना औषधोपचार देतानाही जिल्हा परिषद शिक्षकांची मदत घ्यावी लागणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यामधील ग्रामीण भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ग्रामस्तरावर ग्राम दक्षता कमिटीचे सहकार्य घेणे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे काम आहे. आशा कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाला एक दिवसात भेट देणेही बंधनकारक करणे आवश्यक आहे. यावेळी आशा सेविकांनी त्यांच्या आरोग्यविषयक काळजी घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना उपचार द्यावेत, असे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार यांनी केले.