तिन्ही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष

By admin | Published: July 4, 2016 09:50 PM2016-07-04T21:50:09+5:302016-07-05T00:32:33+5:30

प्रमोद यादव : फलटण येथील आढावा बैठकीत सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन

The control room at the three lancet floors | तिन्ही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष

तिन्ही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष

Next

फलटण : ‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याच्या फलटण तालुक्यातील वास्तव्या दरम्यान दि. ६ ते ८ जुलै दरम्यान सोहळ्यासमवेत येणारे दिंडीकरी, वारकरी, भाविक यांच्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे सर्व नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे योग्य नियोजन करावे आणि पालखी सोहळा यशस्वी करावा,’ असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी केले.
येथील तहसील कार्यालयात पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अधिकराव पाटील, निवासी नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे आदी उपस्थित होते.
‘महसूल खात्याच्या वतीने तालुक्यातील तरडगाव, फलटण व बरड या तीनही पालखी तळांवर नियंत्रण कक्ष राहणार असून, तेथे महसूल खात्याच्या विशेष पथकाद्वारे सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून तसेच सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त यांच्याशी संपर्कात राहून सर्व नियोजनाचे नियंत्रण व योग्य व्यवस्था राखण्यासाठी कार्यरत राहील, त्याचबरोबर तहसील कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, तेथूनही सर्व व्यवस्थेचे नियोजन व आवश्यक ती मदत पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे,’ असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले.
महसूल खात्यांतर्गत पुरवठा विभागाच्या माध्यमातून सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी भाविकांना रॉकेल व गॅस इंधन स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी तरडगाव येथे ५, विठ्ठलवाडी येथे १ फलटण पालखी तळावर (विमानतळ) ५, मार्केट यार्ड येथे १ (नांदले दुकान), बरड येथे २ याप्रमाणे रॉकेल उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्वयंपाकाच्या गॅस वितरणासाठी तरडगाव येथे ३, फलटण येथे २, बरड येथे २ विशेष केंद्र कार्यरत राहणार असून, या सर्व केंद्रांसाठी पुरेशा प्रमाणात रॉकेल व स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तरडगाव व बरड येथील पालखी तळाकडे जाणारे रस्ते व्यवस्थीत ठेवण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासून घेण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून पालखी मार्गावर १० ठिकाणी टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)


वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा
वारकरी, दिंडीकरी, भाविकांना पुरेशी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १० वैद्यकीय अधिकारी व ३० कर्मचारी, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वप्रकारचा पुरेसा औषध साठा उपलब्ध केला जाणार आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सोहळ्यातील वैद्यकीय सेवा सुविधांसाठी ३७ वैद्यकीय अधिकारी, १३८ कर्मचारी, ५ वाहनांसह विशेष पथके, उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सोहळ्या समवेत २ वैद्यकीय पथके व १०८ क्रमांकाच्या २ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. व्ही. व्ही. पोटे यांनी सांगितले.

Web Title: The control room at the three lancet floors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.