गणरायासमोर साप खेळवणारे ताब्यात
By Admin | Published: September 21, 2015 11:34 PM2015-09-21T23:34:55+5:302015-09-21T23:41:49+5:30
कऱ्हाडात कारवाई : दहा विषारी, बिनविषारी सर्प जप्त; ‘सोशल मीडिया’मुळे प्रकार उघड
कऱ्हाड : गणपतीच्या स्टेजवर जिवंत सापांचा खेळ करणाऱ्या सर्पमित्रांच्या टोळीचा व्हिडीओ व छायाचित्रे ‘सोशल साईट’वरून व्हायरल झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या वनविभागाने या सर्पमित्रांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. याप्रकरणी सोमवारी दुपारी वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहीजणांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या सर्पमित्रांकडून वनविभागाने नाग, घोणस यासारखे विषारी व काही बिनविषारी असे एकूण दहा साप जप्त केले आहेत. संबंधित साप तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरू होती. कऱ्हाडातील एका गणेश मंडळाच्या स्टेजवर रविवारी रात्री एक देखावा सादर करण्यात आला होता. या देखाव्यात काहीजण जिवंत साप हातामध्ये घेऊन त्यांचा खेळ सुरू होते. नागाच्या फण्याचे चुंबन घेणे, स्टेजवर ठेवलेल्या सापाच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या फण्यावर ओठ टेकवणे, साप प्रतिसाद देत नसेल तर त्याच्या फणावर कागदी पुठ्ठ्याने मारणे असे प्रकार त्या
देखाव्यात झाले होते. काही दर्शकांनी हौसेखातर या देखाव्याचे चित्रीकरण केले. तसेच काहींनी मोबाईलमध्ये छायाचित्रेही घेतली. रविवारी रात्रीपासून हे व्हिडीओ व छायाचित्रे सोशल मीडियावरून सर्वत्र पसरली.वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे वन्यजीव विभागाच्या दिल्लीतील कार्यालयापर्यंत पोहोचली. तेथील अधिकाऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहिती मिळविली. त्यावेळी व्हिडीओ व छायाचित्रे कऱ्हाडातील असल्याचे समोर आले. सोमवारी सकाळी याबाबत कऱ्हाडच्या वनविभागाला माहिती देऊन कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेण्यास सुरूवात केली.संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळविली. त्यामध्ये सर्पांशी खेळताना दिसणाऱ्या युवकांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये त्यांना तीन
विषारी नागांसह घोणस, धामण व अन्य काही जातींचे एकंदर दहा साप आढळले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत दोघांना ताब्यात घेतले होते. अन्य काही जणांनाही यामध्ये अटक होण्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
साप बाळगणे हा गुन्हाच !
सर्पमित्र म्हणून वावरत असताना एखाद्या ठिकाणी साप आढळून आला तर तो पकडून तातडीने सुरक्षित ठिकाणी सोडून देणे योग्य आहे. मात्र, साप स्वत:जवळ बाळगून ठेवणे हा गुन्हाच असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.