‘पेटी मेंबर’वर संक्रांत; पक्षाला तिळगूळ वाटा

By Admin | Published: January 13, 2017 10:30 PM2017-01-13T22:30:46+5:302017-01-13T22:30:46+5:30

‘सांगलीचा प्रसाद’ म्हणे पक्ष निधीला : शरद पवारांनी सांगितलेल्या किश्श्यातून झेडपी सदस्यांना जणू सांकेतिक इशारा

Converted to 'Belly Member'; Tilal's contribution to the party | ‘पेटी मेंबर’वर संक्रांत; पक्षाला तिळगूळ वाटा

‘पेटी मेंबर’वर संक्रांत; पक्षाला तिळगूळ वाटा

googlenewsNext



सातारा : शेंद्रेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. झेडपीची उमेदवारी मागण्यासाठी बारामतीच्या बंगल्यात गेलेल्या साताऱ्याच्या एका मेंबरला त्यांनी ‘सांगलीकरांकडून मिळालेला प्रसाद अगोदर पक्षाला निधी म्हणून द्या, मग तिकिटाचं बघू,’ असं सांगितलं. हा किस्सा रंगवून सांगण्यामागचा अर्थ जिल्ह्यातील मेंबर मंडळींनी ओळखला असून, ‘तिकडून घेतलेला प्रसाद आता इकडं पक्षाला द्यावा लागणार,’ याची खूणगाठही अनेकांनी बांधली आहे म्हणे. त्यामुळं या ‘पेटी मेंबर’ मंडळींवर जणू संक्रांत ओढावली असून, एकट्याने खाल्लेला ‘प्रसाद’ आता तिळगुळासारखा वाटावा लागणार आहे म्हणे.
सातारा-सांगली विधान परिषद मतदारसंघ राष्ट्रवादीच्या हातून गेल्यामुळे मनात भळभळणारी जखम घेऊनच शरद पवार साताऱ्यात आले होते. सांगलीतून ज्यांनी ‘लक्ष्मीचा प्रसाद’ घेतला, त्यांची यादीच आपल्याजवळ असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी अजिंक्यतारा कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात केला. पतंगरावांकडूनच नव्हे तर शेखर गोरेंकडूनही प्रसाद घेतलेल्यांनी पहिल्यांदा तो राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे पोचवावा, त्यानंतरच तिकीट मागायला यावे, अशी कोपरखळीही पवारांनी शेलक्या भाषेत लगावली.
राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातच विधान परिषद निवडणुकीत मते फुटल्याने शरद पवार चिंतेत पडले होते. ही चिंता त्यांनी मेळाव्यात व्यक्त केली. केंद्र व राज्यातील सत्ता गेल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत लागणाऱ्या निधीची चिंताही यानिमित्ताने पक्षाला भेडसावत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आले. ५० वर्षांच्यापेक्षा जास्त काळ राजकारणात घालविणाऱ्या या नेत्याने अनेकांची कुंडली आपल्याकडे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. तसेच सांगलीचे नेते अन् आपण एकाच शिक्षण संस्थेत संचालक असल्याने गप्पांच्या ओघात मागील गुपिते समोर येतात, हेही त्यांनी सांगून टाकले. कुणी चिमूटभर, कुणी चमचाभर तर कुणी वाटीभर प्रसाद घेतला. त्यांनी आता गपचूपपणे पक्षाकडे जमा करण्याचा आदेशही पवारांनी काढला.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करायचे आणि ऐन युद्धाच्यावेळी विरोधकांशी तह करायचा, असा प्रकार इथून पुढे खपवून घेतला जाणार नाही, हेही स्पष्ट झाले. सकाळ-संध्याकाळ अशा प्रसादाला जे हपापले आहेत, असे कार्यकर्ते सोबत नसतील तरी चालेल, असेही निक्षून सांगितले.
समोरच्या गर्दीचा अंदाज घेऊन काय बोलायचे, हे खा. शरद पवार यांच्याइतके कोण जाणत असेल? पवारांनी अजिंक्यताऱ्यावरील सभेत जमलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या ओघवत्या भाषेत जिंकले. मोदींच्या निर्णयामुळे कृषी अर्थव्यवस्था अडचणीत येऊन शेती मालाला
दर मिळत असल्याचे सांगताना पवारांनी साताऱ्याची हळद अन् नागठाण्याचे आले,’ असा उल्लेख केला. या मेळाव्याला नागठाणे परिसरातीलच शेतकरी मोठ्या संख्येने असणार, हे लक्षात घेऊन पवारांनी नागठाण्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची वात सुलगावून पवार बारामतीकडे परतले आहेत. पवारांच्या कोपरखळ्यांमधून प्रत्येक कार्यकर्त्याने वेगळा-वेगळा अर्थ काढला असणार, हे निश्चित. पण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने चांगलीच वातावरणनिर्मिती झाली. (प्रतिनिधी)
पवारांना तिकीट मागायला गेलेला कोण?
‘एक गडी माझ्याकडे तिकीट मागायला आला होता. सांगलीची जी यादी माझ्याकडे होती, त्यात या गड्याचं नाव होतं. तुला प्रसाद पोचला होता का? असं विचारताच तो गडबडला, थरथर कापायला लागला,’ असं पवारांनी चपखल भाषेत स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषदेचं तिकीट पवारांकडे मागायला गेलेला हा महाभाग कोण? याचीच चर्चा जिल्हाभर सुरू आहे.
पवारांना तिकीट मागायला गेलेला कोण?
‘एक गडी माझ्याकडे तिकीट मागायला आला होता. सांगलीची जी यादी माझ्याकडे होती, त्यात या गड्याचं नाव होतं. तुला प्रसाद पोचला होता का? असं विचारताच तो गडबडला, थरथर कापायला लागला,’ असं पवारांनी चपखल भाषेत स्पष्ट केलं. दरम्यान, जिल्हा परिषदेचं तिकीट पवारांकडे मागायला गेलेला हा महाभाग कोण? याचीच चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

Web Title: Converted to 'Belly Member'; Tilal's contribution to the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.