चोरटे घुसले भुयारात; जमिनीतील पाच लाखांची कॉपर वायर लंपास, कऱ्हाडातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:07 PM2024-10-04T12:07:42+5:302024-10-04T12:08:59+5:30

दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्याने प्रकार उघड

Copper wire worth Rs 5 lakh buried underground for telephone service in Karad looted by thieves | चोरटे घुसले भुयारात; जमिनीतील पाच लाखांची कॉपर वायर लंपास, कऱ्हाडातील घटना 

चोरटे घुसले भुयारात; जमिनीतील पाच लाखांची कॉपर वायर लंपास, कऱ्हाडातील घटना 

कऱ्हाड : दूरध्वनी सेवेसाठी जमिनीखालून पुरून नेलेली सुमारे पाच लाख रुपयांची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली. कऱ्हाडातील बसस्थानक ते उपजिल्हा रुग्णालयादरम्यान ही घटना घडली. याबाबत बीएसएनएल कंपनीचे उपमंडल अभियंता शशिकांत अण्णा माळी यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कऱ्हाडच्या बीएसएनएल कार्यालयात शशिकांत माळी हे उपमंडल अभियंता म्हणून कार्यरत आहेत. २०१८ साली बीएसएनएल कंपनीने ग्राहकांच्या दूरध्वनी जोडणीसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जमिनीच्या खालून तांबे धातूच्या केबल टाकल्या आहेत. ही केबल लाईन जमिनीखाली सहा फूट असून, प्रत्येकी दोनशे मीटर अंतरावर त्याचे चेंबर आहेत. या चेंबरला गोलाकार सिमेंटचे झाकण असून ते झाकण काढून चेंबरमध्ये उतरून केबलपर्यंत पोहोचता येते.
शहरातील दैत्यनिवारणी मंदिर येथील दूरध्वनी कार्यालयापासून कृष्णा नाक्यावरील एरम हॉस्पिटलपर्यंत ही लाईन टाकण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी बसस्थानक ते उपजिल्हा रुग्णालय परिसरातील ग्राहकांनी त्यांचे दूरध्वनी बंद असल्याबाबत बीएसएनएल कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार उपमंडल अभियंता शशिकांत माळी यांच्यासह कर्माचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता बसस्थानकापासून उपजिल्हा रुग्णालयापर्यंत जमिनीखालून असलेली केबल त्यांना दिसली नाही. 

कामानिमित्त वरिष्ठ बीएसएनएल कार्यालयामार्फत ही केबल काढण्यात आली असावी, असा समज झाल्याने उपमंडल अभियंता माळी यांनी याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे चौकशी केली. मात्र, त्या परिसरात कोणतेही काम करण्यात आले नसल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले. त्यामुळे माळी यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता चोरट्यांनी चेंबरमध्ये उतरून जमिनीखालून पुरून नेलेली १ हजार २०० पिअरची, २०० मीटर लांब व पाच इंच व्यास असलेली ४ लाख ८० हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत शशिकांत माळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवालदार रूपाली कांबळे तपास करीत आहेत.

Web Title: Copper wire worth Rs 5 lakh buried underground for telephone service in Karad looted by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.