आरोग्य योजना प्रसिद्धीला कोपऱ्याची जागा
By admin | Published: April 5, 2017 12:40 AM2017-04-05T00:40:15+5:302017-04-05T00:40:15+5:30
कऱ्हाड पंचायत समिती : नोटीस बोर्डावर पत्रकांचे तोरण; अधिकाऱ्यांकडून दिखाव्यापुरताच उत्साह
कऱ्हाड : शासनाच्या नवीन वर्षात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची प्रसिद्धी करून त्या ग्रामीण भागात काटेकोरपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून खूप प्रयत्न केले जातात. मग लाखो रुपये खर्चून योजनांचे आकर्षक प्रसिद्धी फलक (पोस्टर्स) तयार केले जातात. मात्र, त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी काही अधिकाऱ्यांच्यातून नुसता ‘दिखाव्या’ पुरताच उत्साह दाखवला जातो. असा प्रकार कऱ्हाड येथील पंचायत समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.
या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागासाठी ‘माता परिपूर्ण प्रेम’ असा संदेश देणाऱ्या विविध संदेश व योजनांचे नवेकोरे फलक पंचायत समितीच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहेत.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात. मात्र, या शासनाकडून येणाऱ्या ‘योजना नुसत्या नावाला मिळेना कुठल्या लाभार्थ्या’ला असे चित्र दिसून येत आहे. येथील पंचायत समितीमध्ये योजना आल्या कधी आणि गेल्या कधी याची सुद्धा माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. याउलट जिल्हा परिषदेकडून अनेक योजनांची प्रसिद्धी करण्यासाठी योजनांचे फलक पाठविले जातात. मात्र, ते फलक दर्शनी भागात लावण्याची साधी तसदी सुद्धा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही.
सध्या पंचायत समितीमधील आरोग्य विभागात अनेक योजनांच्या प्रसिद्धीचे नवेकोरे फलक जिल्हा परिषदेमार्फत आलेले आहेत. सुमारे आठ दिवसांपूर्वी आलेले हे फलक दर्शनी भागात लावण्याऐवजी ते पंचायत समितीच्या इमारतीच्या कोपऱ्यात तसेच ठेवलेले आहेत. यावर आता धूळही साचली आहे. या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ते फलक दिसत असल्याने हे फलक दर्शनी भागात कधी लावले जाणार, अशी विचारणा त्यांच्यातून केली जात आहे. येथील इमारतीमध्ये प्रवेशद्वारावर नवेकोरे नोटीस बोर्डही ठेवण्यात आले आहे खरे. मात्र, त्या नोटीस बोर्डावर सूचना, निविदांच्या पत्रकांचे जणू तोरणच बांधले असल्याचे दिसून येत आहे. कशाही वाकड्या स्वरूपात निवेदन, प्रसिद्धीपत्रके चिकटविण्यात तसेच लोंबकळत असलेली दिसून येत आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग या विभागांमध्ये नव्या योजना नेहमी येत असतात. मात्र, त्याची प्रसिद्धी ही मासिक सभेशिवाय दिली जात नाही. शिवाय नव्या योजनांचे एकही फलक हे लावले जात नाहीत. त्यामुळे योजना कधी आल्या आणि कधी निघून गेल्या याची माहिती देखील या ठिकाणी येणाऱ्या सदस्यांना व नागरिकांना मिळत नाही. आतातर कऱ्हाड पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोपऱ्यातच आरोग्य विभागातील आरोग्यदायी संदेशाचे नवेकोरे फलक ठेवण्यात आलेले असल्याने हे फलक दर्शनी भागात लावा, असे या विभागातील अधिकाऱ्यांना कोण सांगणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)