कोरोनाबाधित विद्यार्थिनीच्या मैत्रिणींचे अहवाल ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:06+5:302021-03-04T05:14:06+5:30
विभागातील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. सदर विद्यार्थिनीच्या तारळे परिसरातील नातेवाइकाचा कोरोना अहवाल ...
विभागातील एका विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा अहवाल कोरोनाबाधित आला होता. सदर विद्यार्थिनीच्या तारळे परिसरातील नातेवाइकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातच शाळेतील तपासणीदरम्यान विद्यार्थिनीच्या शरीराचे तापमानही जास्त आढळून आले होते. त्यामुळे शाळा प्रशासनाने तात्काळ त्या विद्यार्थिनीची कोरोना चाचणी केली. उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची व तिच्या वडील, बहीण यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थिनीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
दरम्यान, त्या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या इतर सहा विद्यार्थिनींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती डॉ. संजय कुंभार यांनी दिली. विद्यार्थिनीच्या आरोग्याची दक्षता म्हणून शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. शाळा कधी सुरू करायची याचा निर्णय स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सल्ल्याने घेणार असल्याची माहिती देण्यात आली.