कोरोना आला; इतर आजार मात्र गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:26+5:302021-01-04T04:31:26+5:30
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनानंतर रुग्णांची हळूहळू गर्दी वाढू लागलीय. मात्र, पूर्वीसारखी अद्याप रुग्णालयात गर्दी दिसून येत नसून ...
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये कोरोनानंतर रुग्णांची हळूहळू गर्दी वाढू लागलीय. मात्र, पूर्वीसारखी अद्याप रुग्णालयात गर्दी दिसून येत नसून दिवसाला पाचशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे कोरोना आल्यानंतर इतर आजार चुटकीसरशी गेले की काय? अशी स्थिती रुग्णालयात पाहावयास मिळत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील ओपीडीमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी दिवसाला तब्बल ८०० रुग्ण तपासणीसाठी येत होते. परंतु कोरोनाच्या महामारीत हे प्रमाण दिवसाला दहावर आले होते. मधुमेह, पोटदुखी, ब्लडप्रेशर, डोकेदुखी, त्वचारोग यांसारखे आजार असणारे रुग्ण अचानक कमी झाले. कोरोनाच्या धास्तीमुळे ही रुग्णसंख्या रोडावली की, रुग्णांच्या भीतीपोटी आजार बरा झाला, हे वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे. जिल्ह्यात तब्बल सहा महिने कडेकोट लाॅकडाऊन होता. या कालावधीत शासकीय रुग्णालयात ओपीडीमध्ये अक्षरश: शुकशुकाट होता. क्वचित एखाद्दुसरा रुग्ण येत होता; परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतरही आता रुग्णालयातील परिस्थिती कायम आहे. रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल होत असल्याने अनेकजण भीतीपोटी तपासणीसाठी येत नसल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारा या कालावधीत रुग्णालयात गर्दी होत आहे; परंतु दुपारनंतर रुग्णालयात तुरळक गर्दी होत आहे.
आजार पळाले की कोरोनाची भीती?
रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे अनेकजण भीतीपोटी येत नाहीत; परंतु असे अनेकजण आहेत, त्यांचा मानसिक आजार असतो. हा आजार अनेकांचा कोरोनाच्या भीतीने निघून गेला आहे. पूर्वी त्रास होत होता; परंतु अचानक शारीरिक त्रास होणे बंद झाल्याचे रुग्ण सांगत आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.