खटाव, फलटण तालुक्यांत कोरोनाचा विस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:35+5:302021-05-25T04:44:35+5:30
सातारा : जिल्ह्यात सोमवारी २ हजार ४८ इतके विक्रमी कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१ बाधितांचा मृत्यू झाला. खटाव, फलटण ...
सातारा : जिल्ह्यात सोमवारी २ हजार ४८ इतके विक्रमी कोरोनाबाधित आढळून आले असून, ३१ बाधितांचा मृत्यू झाला. खटाव, फलटण या दोन तालुक्यांत मिळून हजारांच्यावर रुग्ण सापडल्याने या दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सातारा तालुक्यात मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. मंगळवारी मात्र खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाचशेच्यावर रुग्ण आढळून आले. खटाव तालुक्यात ५६६, तर फलटण तालुक्यात ५१५ रुग्ण बाधित आढळले. खंडाळा, माण आणि सातारा या तालुक्यांतदेखील रुग्ण संख्या मोठी असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ५१ हजार ३८७ वर जाऊन पोहोचला आहे. रुग्णांचा मृत्युदर कायम असल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.
सातारा शहर, उपनगरे, तसेच तालुक्यामध्ये विविध गावांत अजूनही मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे संसर्ग आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या सोमवारी संध्याकाळपर्यंत २,१४२ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
१९ हजार १४६ रुग्णांवर उपचार
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोरोना सेंटर्स, तसेच गृह विलगीकरण मध्ये १९ हजार १४६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील ७९ रुग्णालयांना ८४२ इतके रेमडेसेविर इंजेक्शन मंगळवारी देण्यात आले.
चौकट
तपासण्या वाढल्या तसे रुग्णही वाढले
जिल्ह्यात सोमवारी १४ हजार ३५६ इतक्या आतापर्यंतच्या सर्वांत जास्त चाचण्या करण्यात आल्या. या चाचणीमध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळले. मात्र, बाधित वाढण्याचा दर कमी झाल्याने दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित यांचा दर १८.४२ टक्के इतका कमी झाला आहे.