सामाजिक बांधिलकीतून उभारले कोरोना केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:32 AM2021-05-03T04:32:47+5:302021-05-03T04:32:47+5:30
अंगापूरः साताऱ्यातील टॉप गिअर ट्रान्समिशन कंपनीचे सर्वेसर्वा श्रीकांत व शशिकांत भाऊसाहेब पवार या बंधूंनी ...
अंगापूरः साताऱ्यातील टॉप गिअर ट्रान्समिशन कंपनीचे सर्वेसर्वा श्रीकांत व शशिकांत भाऊसाहेब पवार या बंधूंनी वर्णे येथील श्री काळभैरव विद्यालयात स्वखर्चातून २० बेडचे सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर सुरू केले.
मागील महिनाभरापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गाव कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेड, इंजेक्शन व औषधांसाठी गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली. काहींना बेड व औषधोपचार मिळाले. परंतु काहींच्या पदरी निराशा येऊन घरातील व्यक्तिंना कायमचे गमवावे लागले. काहींना हॉस्पिटल, बेड मिळाले नाहीत, औषधोपचार वेळेत मिळाले नाहीत. आजही गावात परिस्थिती गंभीर असून, आरोग्य विभाग कोरोना टेस्ट, लसीकरण, जनजागृती, औषधे वितरणाच्या माध्यमातून ग्रामपंचायत व ग्राम दक्षता कृती समितीच्या मदतीने पूर्ण ताकदीने राबत आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी गावबंदी, काही दिवस जनता कर्फ्यू यांसारखे प्राथमिक उपाय करूनसुध्दा रुग्ण संख्या कमी येत नाही. याच परिस्थितीचा आढावा घेत गावावरचे संकट पाहून पवार बंधूंनी स्वखर्चाने २० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले. यामध्ये आठ ऑक्सिजन बेड्स, लाईट गेली तरी पॉवर बॅकअपसाठी जनरेटर, वाफ घेण्यासाठी मशीन्स, ऑक्सिमीटरसह थर्मामीटर, गरम पाण्यासाठी गिझरची सोय उपलब्ध केली आहे.
रुग्णांना चहापान व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी तसेच कोविड सेंटर गावात असल्याने जेवणाची सोय प्रत्येकाच्या घरून होणार आहे. गावातील पेशंट एकाच ठिकाणी असल्याने कोरोनाची भीती दूर होण्यासाठी मदत होईल. विलगीकरण कक्षामुळे घरातील इतर सदस्य सुरक्षित राहणार आहेत. शासकीय आरोग्य अधिकारी, कर्मचारी व गावातील सर्व स्थानिक डॉक्टर मोफत आरोग्य सेवा देणार आहेत. टॉप गिअर ट्रान्समिशन ग्रुप संचलित श्री काळभैरव कोरोना सेंटर गावासाठी खूप मोलाचे ठरणार असून, याचा आदर्श जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील इतरांनीसुध्दा घ्यावा, असे परिसरात बोलले जाऊ लागले आहे.