गृहविलगीकरणातील रुग्ण ठरतायत कोरोनाचे वाहक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:50+5:302021-04-22T04:40:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे, तर दुसरीकडे ...

Corona carriers become homeless patients! | गृहविलगीकरणातील रुग्ण ठरतायत कोरोनाचे वाहक !

गृहविलगीकरणातील रुग्ण ठरतायत कोरोनाचे वाहक !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे, तर दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने ७० टक्के रुग्ण हे घरातूनच उपचार घेत आहेत. या रुग्णांना घरपोच सेवा मिळत नसल्याने त्यांना स्वत: बाजारपेठेत खरेदीसाठी ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे कोण बाधित आहे आणि कोण नाही याचा कसलाच मागमूस लागत नसल्याने गृहविलगीकरणातील रुग्ण कोरोनाचे वाहक ठरू लागले आहेत.

सातारा शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू लागले आहे. दररोज दीडशे ते दोनशे कोरोनाबाधित रुग्ण शहरात आढळून येत आहेत. त्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. रुग्णांना उपचारासाठी बेडच मिळत नसल्याने घरातून उपचार घेण्याशिवाय बहुतांश रुग्णांपुढे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. सद्यस्थितीला सातारा शहरात तब्बल ८५० रुग्ण गृहविलगीकरणतून उपचार घेत आहेत, तर २५० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

गृहविलगीकरणातील रुग्णांना प्रशासनाकडून केवळ फोनद्वारे संपर्क साधला जात आहे आणि त्यांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे. या पलीकडे कोणत्याही ठोस उपाययोजना प्रशासनाकडून राबविल्या जात नाही. कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल प्राप्त होऊन त्याचा पूर्ण पत्ता शोधेपर्यंत तीन ते चार दिवसांचा कालावधी निघून जातो. पत्ता मिळाल्यानंतर पालिकेकडून तो परिसर सील केला जातो. या कालावधीत गृहविलगीकरणातील नागरिक निर्धास्त फिरत असतात. कोणत्याच मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत उपलब्ध होत नसल्याने हे रुग्ण खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत. काही रुग्ण स्वत:ची व नागरिकांची काळजी घेत असले तरी धोका हा कायमच आहे. अशा रुग्णांमुळेच शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याला नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

(पॉइंटर)

गतवर्षी राबविलेल्या उपाययोजना

- पालिका प्रशासनाने गतवर्षी गृहभेटीद्वारे नागरिकांचा सर्व्हे केला. त्यांच्या आरोग्याच्या नोंदी ठेवल्या.

- पर जिल्ह्यातून अथवा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर प्रशासनाची बारकाईने नजर होती.

- कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी केली जात होती.

- पालेभाज्या, दूध औषधांसह सर्व अत्यावश्यक सेवा नागरिकांना घरपोच पुरविल्या जात होत्या.

- यासाठी पालिकेने प्रत्येक प्रभागातील दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी जाहीर केली होती.

- अग्निशमन बंब आतून संपूर्ण शहर निर्जंतुक केले होते

(पॉईंटर)

यंदा राबविलेल्या उपाययोजना

- बाधित रुग्ण वाढत असताना पालिकेकडून अद्याप गृहभेटीद्वारे केल्या जाणाऱ्या सर्व्हेचे नियोजन करण्यात आले नाही.

- ज्या ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील त्या अपार्टमेंट अथवा परिसरातील नागरिकांचीच कोरोना चाचणी केली जात आहे.

- एखादे घर किंवा अपार्टमेंट प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जात आहे.

- या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविल्या जात नाही.

- पालिकेची निर्जंतुकीकरण मोहीम केवळ प्रतिबंधित क्षेत्रातच राबविली जात आहे.

- प्रतिबंधित क्षेत्रात देखरेखीसाठी एका देखील अधिकाऱ्यांची नेमणूक यंदा केलेली नाही.

(पॉइंटर)

सातारा शहरातील बाधित : ११००

गृहविलगीकरणातील रुग्ण : ८५०

उपचार घेत असलेले : २५०

आतापर्यंत मृत्यू : १३७

(चौकट)

आणखी कशाची वाट पाहताय..

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे सातारा तालुक्यात आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत. गृहविलगीकरणातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. शहरात सर्व्हे केल्यास कोरोना संशयित व बाधित रुग्णांचा शोधही घेता येईल. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, शिक्षक या कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा कोरोना लढ्यासाठी सहभाग वाढवायला हवा. तरच कोरोनाची साखळी सुटण्यास मदत होईल.

फोटो : २१ कंटेन्मेंट झोन

Web Title: Corona carriers become homeless patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.