खटाव, माण तालुक्यात ऑक्सिजनसह कोरोना सेंटर उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:38 AM2021-04-27T04:38:55+5:302021-04-27T04:38:55+5:30
वडूज : माण, खटाव तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. शासन, खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत. मात्र, ते ...
वडूज : माण, खटाव तालुक्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. शासन, खासगी संस्थांकडून ऑक्सिजन बेड उपलब्ध केले आहेत. मात्र, ते अपुरे पडत आहेत. त्यामुळे माण, खटावमध्ये ड्रीम सोशल फाऊंडेशन आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ऑक्सिजन बेड उभारण्यात येत आहे,’ अशी माहिती निवृत्त कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले, ‘ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा देशमुख आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या प्रमुख रितू छाब्रिया यांच्या सहकार्याने सुसज्ज असे ऑक्सिजन बेड असलेले कोरोना सेंटर उभे करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माण व खटावमध्ये भीषण स्वरूप धारण केलेले आहे. अनेक लोकांना उपचार करूनही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये तरुणांनाही मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने खूप वेदना झाल्या आहेत. घरातील प्रमुख व्यक्तीच्या निधनाने काही कुटुंबांवर मोठा आघात झालेला आहे. आपण सर्वांनी त्या भीतीवर एकजुटीने मात करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत त्यांनी न घाबरता तत्काळ तपासणी करून घ्यावी. उपचार सुरू करावेत. लवकर व योग्य उपचार सुरू केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करता येते. गावागावांत प्रमुख व्यक्तींनी कोरोना संसर्ग तपासणीची मोहीम तीव्र करावी.’
‘बाधित रुग्णांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच एचआरसीटी करावी. घाईगडबड करू नये. ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लागण झालेली आहे त्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करून औषधोपचार सुरू करून देण्याबाबत ग्रामपंचायतींनी कार्यवाही करावी. आपण सर्वानी या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदत करून कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वानी एकमेकांना सहकार्याची भूमिका घ्यावी,’ असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी केले आहे.