कोरोना समित्या हरवल्या... रोगाचा शिरकाव वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:33+5:302021-04-18T04:38:33+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सातारा जिल्ह्याला अक्षरशः हैराण करून सोडले आहे. रोज नव्याने विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा आकडा दीड हजारावर पोहोचला असताना आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत असताना काही महिन्यांपूर्वी अस्तित्वात असलेल्या गावोगावच्या कोरोना समित्या आणि शहरातील प्रभाग समित्या कुठे हरवल्या आहेत, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
मागील वर्षी संपूर्ण देशभर कोरोनाची लाट उसळली होती. सातारा जिल्ह्यात काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली असतानाच प्रशासनाच्यावतीने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले. प्रत्येक गावांमध्ये स्थानिक लोकांची समिती नेमण्यात आली. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची चौकशी समिती करत होती. पुणे, मुंबई तसेच इतर शहरांतून गावात येणाऱ्या व्यक्तीला अनेक ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली, तसेच गावापासून दूर असलेल्या शाळेत अथवा समाज भवनात १४ दिवस लोकांना विलगीकरणात ठेवून नंतरच गावांमध्ये प्रवेश देण्यात येत होता.
अनेक गावांच्या वेशीवर गेट तयार करण्यात आले होते. रस्त्यावर झाडे तोडून टाकण्यात आली होती. दगड रचण्यात आले होते. गावात येणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नव्हती तर बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करत करू शकत नव्हती, अशा पद्धतीने अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच अडवले. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. कोरोना महामारीने अनेक गावांमध्ये वेस ओलांडून गावात प्रवेश केलेला आहे. शहरामध्येदेखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र कुठेही कंटेन्मेंट झोन पाहायला मिळत नाही, गावबंदी दिसत नाही, काही ठिकाणी तर विलगीकरणामध्ये असलेले रुग्ण रस्त्यावर हिंडत आहेत. त्यांचा लोकांशी संपर्क येत आहे, तरीदेखील अशा रुग्णांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यामधील ७७८ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. प्रशासनाच्यावतीने ज्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, हे सदस्य सरपंच आता पदावर राहिलेले नाहीत. जे नवीन पदाधिकारी निवडून आले आहेत त्यांना कोरोनाच्या काळात नेमके काय काम करायचे आहे, याबाबतदेखील नेमकी दिशा मिळत नाही, तसेच गावांमधील लोकांचा वाईटपणा घ्यायला कोणीही तयार नाही. दुसऱ्या बाजूला शहरांमध्ये चमकोगिरी करणारे काही नेतेमंडळींनी आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावात वेळी घरात बसून राहणे पसंत केलेले आहे. युद्धाचा शंखध्वनी ऐकून रस्त्यावर उतरलेले सैन्य ऐन रणांगण तापले असताना कुठे लपले? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
आओ जाओ घर तुम्हारा
कोरोना महामारी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये थैमान घालत असताना लोक रोडावून गेल्याचे चित्र आहे. उपासमारीने मरण्यापेक्षा कोरोना झालेला बरा, अशीही काही जणांची मानसिकता आहे. त्यामुळे जगतील ते जगतील आणि मरतील ते मरतील... जणू अशीच भावना लोकांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावांमध्ये आओ जाओ.. घर तुम्हारा.. अशी स्थिती आहे.
- सागर गुजर