कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:31+5:302021-07-26T04:35:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सातारा पालिकेतील १९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालिकेकडून उचित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गेल्या दीड वर्षापासून कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सातारा पालिकेतील १९ आरोग्य कर्मचाऱ्यांचा पालिकेकडून उचित सन्मान करण्यात आला. या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून नुकताच प्रोत्साहन भत्ता अदा करण्यात आल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील संगम माहुली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेने अंत्यसंस्कारासाठी एकूण १९ कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले असून, प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षापासून हे पथक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम अविरतपणे करत आहेत. चार हजारांहून अधिक कोरोना मृतांवर या पथकाने आजवर अंत्यसंस्कार केले आहेत. तरीही एकाही कर्मचाऱ्याला अद्याप कोरोनाची लागण झाली नाही.
या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा ठराव पालिका प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. त्यानुसार, नुकतीच प्रोत्साहन भत्याची रक्कम वेतनासह कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. प्रभारी आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, आरोग्य निरीक्षक सागर बडेकर, मुकादम संदीप पाठसुते, सफाई कर्मचारी कपिल मट्टू, तुकाराम खंडूझोडे, अमोल खंडूझोडे, लक्ष्मण कांबळे, यशवंत कांबळे, विश्वास लोखंडे, प्रमोद गाडे, शंकर भंडारे, शंकर कमाने, अमोल वाघमारे, प्रेमसिंग मोहिते, दत्तात्रय जाधव, सुरेश भिसे, हनुमंत फडतरे, अशोक चव्हाण व योगेश तारळेकर या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अदा करण्यात आली. पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकट काळात जबाबदारीने व स्वत:ला झोकून देऊन काम केले आहे. प्रशासनाने उशिरा का होईना, परंतु कामाची दखल घेत त्यांना प्रोत्साहन भत्ता दिल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.