कोरोना डेथ ऑडिट; ६० टक्के रुग्णांना आधीपासूनच आजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:43+5:302021-06-24T04:26:43+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असलीतरी या संकटाने अनेकांना ग्रासले आहे. तसेच चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असलीतरी या संकटाने अनेकांना ग्रासले आहे. तसेच चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आधीपासूनच आजार असणाऱ्या जवळपास ६० टक्के रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू हे ६० ते ७० वयोगटातील आहेत. तसेच दोन बालकांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात मागील सव्वा वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८७ हजारांवर बाधित स्पष्ट झाले आहेत, तर ४२३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वृद्धांना अधिक करून संसर्ग झाल्याचे दिसून आले, तर मार्चपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. या लाटेत तरुणांनाही कोरोनाचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. पहिल्या लाटेत ४० हजार तर दुसऱ्या लाटेत सव्वा लाखाहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तसेच दुसऱ्या लाटेत कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे, तरीही धोका कायम आहे. त्यातच कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाने मोठी तयारी केली आहे. त्यासाठी बेड, व्हेंटिलेटर व्यवस्था, उपचाराची सुविधा तयार करण्यात येत आहे.
.................................................
वयोगटनिहाय महिला आणि पुरुषांचे मृत्यू
महिला वयोगट पुरुष
१ १० वर्षांपर्यंत १
६ ११ ते २० २
१४ २१ ते ३० ३५
५३ ३१ ते ४० १५८
१४३ ४१ ते ५० २८२
२६४ ५१ ते ६० ५४१
४४३ ६१ ते ७० ८७६
३२३ ७१ ते ८० ६८७
११८ ८१ वर्षांपुढील २९२
........................................................
सर्वांत अधिक मृत्यू...
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६० ते ८० वयोगटातील सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६१ ते ७० गटातील १३१९ व ७१ ते ८० वर्षातील १०१० जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर ८१ वर्षांपुढील ४१० वृद्धांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे.
...........................................................
२४ तासांत ५० हून अधिक जणांचा मृत्यू...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत एका दिवसात काहीवेळा ३०, ४० बाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पण, दुसऱ्या लाटेत २४ तासांत ५० हून अधिक रुग्णांचा बळी गेल्याचेही दिसून आले. तसेच कोरोना बाधितांची संख्या वाढेल त्या प्रमाणात मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना मृत्यू हे सातारा तालुक्यात नोंदले आहेत. तसेच कऱ्हाड तालुका यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
............................................................
सर्वांत जास्त मधुमेहीचे रुग्ण...
कोरोनाच्या आतापर्यंतच्या दोन लाटांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये मधुमेह असणाऱ्यांना अधिक करून कोरोनाने जवळ केले. जिल्हा आरोग्य विभागाने पार पाडलेल्या मोहिमेत तीन लाखांहून अधिक व्याधीग्रस्त रुग्ण आढळून आले होते. ३० लाख ५२ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली. यामध्ये दुर्धर व्याधी असणारे ३ लाख २३ हजारांवर नागरिक आढळले, तर सारीची लक्षणे असणारे साडेबारा हजार, कोरोनाचे ८१४ आणि ऑक्सिजन पातळी कमी असणारे ५८१ जण समोर आलेले. आढळून आलेल्या कोरोना बाधितांवर तातडीने उपचार करण्यात आले.
.............................................................