कोरेगावातून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:55+5:302021-05-21T04:41:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘कोरेगाव शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी अडचणीचा विषय आहे. कोरोना रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ...

Corona deported from Koregaon | कोरेगावातून कोरोना हद्दपार

कोरेगावातून कोरोना हद्दपार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘कोरेगाव शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी अडचणीचा विषय आहे. कोरोना रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी केले.

येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये कोरेगाव शहरासाठी स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे, डॉ. संजय चिवटे, डॉ. विजया जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्ष रेश्मा कोकरे, उपनगराध्यक्ष मंदा बर्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

प्रांताधिकारी पाटील म्हणाल्या की, ‘शहरात कोरोनाचा वाढता प्रसार सर्वांसाठी विचार करणारी गोष्ट बनली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कोरोनाविरोधात मोठी चळवळ उभी केली आहे. कोरोना रोखण्यासाठी त्यांनी हाती घेतलेले उपक्रम व मोहीम अत्यंत चांगली आहे. प्रशासनासह आरोग्य विभागाला ते नेहमीच सहकार्य करत आहेत. आवश्यक तेथे सूचना करत आणि मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध होणारे स्वयंसेवक खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत.

गणेश किंद्रे म्हणाले, पोलीस दलाने कोरोना काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केले आहे. लसीकरण केंद्र येथे पोलीस दलाच्यावतीने बंदोबस्त दिला जाईल. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. उपजिल्हा रुग्णालयाच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही डॉ. चिवटे यांनी दिली. यावेळी नगरसेवक संजय पिसाळ, जयवंत पवार, महेश बर्गे, बचूशेठ ओसवाल, नागेश कांबळे, संतोष कोकरे, किशोर बर्गे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(चौकट)

फक्त कोरेगाव शहराचे लसीकरण होणार

मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे सुरू करण्यात आलेले लसीकरण केंद्र हे पूर्वी उपजिल्हा रुग्णालयात होते. लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी हे केंद्र स्थलांतरित करण्यात आले आहे. या केंद्रावर कोरेगाव शहरातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. अन्य गावातील नागरिकांना येथे लस दिली जाणार नाही. त्यामुळे या केंद्रावर कोणीही गर्दी करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Corona deported from Koregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.