कोरोनाच्या महामारीमुळे लग्नसोहळे झाले कमी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:23+5:302021-05-20T04:42:23+5:30
सातारा : कोरोना महामारीचे संकट मागील एक वर्षाहून अधिक काळापासून असल्याने लग्नसोहळे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच ...
सातारा : कोरोना महामारीचे संकट मागील एक वर्षाहून अधिक काळापासून असल्याने लग्नसोहळे कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जिल्ह्यातील जन्मदर कमी झाला असून कोरोनामुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा आणि दिवाळीनंतर विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडतात. एका-एका तिथीला जिल्ह्यात शेकडोच्या संख्येत विवाह होतात. पण, गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट निर्माण झाले. त्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे उन्हाळ्यात लग्नतिथी असतानाही विवाह सोहळ्यांवर मर्यादा आली. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच विवाह झाले. पण, तेही गुपचूप पध्दतीने. त्यातच दिवाळीच्यावेळी लॉकडाऊन काहीसा शिथिल केला होता. त्यामुळे अनेकांनी ठरलेले विवाह पार पाडले. मात्र, सद्यस्थितीत पुन्हा लॉकडाऊन आहे. यामुळे विवाहांवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लग्न करणे थांबले आहे.
कोरोनामुळे विवाह थांबले आहेत, तर जिल्ह्यातील जन्मदर कमी होत असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यूचा दर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
..................................
चौकट :
लग्नांची संख्याही घटली...
जिल्ह्यात तिथीनुसार वर्षभर विवाह सोहळे पार पडतात. पण, उन्हाळ्याच्या काळातील दोन ते तीन महिन्यात लग्नतिथीही अधिक असतात. त्यामुळे हजारोच्या संख्येत लग्ने होतात. काहीजण घरी लग्न करतात, तर अनेकजण मंगल कार्यालयातील लग्नांना पसंती देतात. गेल्यावर्षी काही प्रमाणात विवाह पार पडले. पण, यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्नांवर बंधने आली आहेत. काही लग्ने गुपचूप उरकली जात असली तरी, प्रमाण एकदमच कमी आहे. तरीही अशा लग्नांवर पोलिसांचा वॉच आहे.
.........................
जन्मदरात घसरण होणार...
जिल्ह्यात दरवर्षी ४० हजारांच्यावर बालकांचा जन्म होतो. पण, यावर्षी जन्मदराचे प्रमाण घसरणार आहे. दुसरीकडे कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे जिल्ह्याचा मृत्यूदर अधिक राहण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
....................................
वर्ष जन्म मृत्यू अर्भक मृत्यू
२०१७ ३९९५५ १५९८९ २०१
२०१८ ४६१४९ २१५०१ २५२
२०१९ ४६१७८ २०८९४ ३७८
.....................................................