मलकापुरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:12+5:302021-05-08T04:41:12+5:30
माणिक डोंगरे मलकापूर : मलकापुरात तीन महिन्यांत केवळ ११६, तर एका महिन्यात ४५३ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात ...
माणिक डोंगरे
मलकापूर : मलकापुरात तीन महिन्यांत केवळ ११६, तर एका महिन्यात ४५३ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात सरासरी दिवसाला किमान १५ बाधित सापडले, तर १६ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत एकूण १ हजार ६५५ बाधित झाले. त्यापैकी १ हजार ३७७ जणांनी कोरोनावर मात केली, तर ५४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे स्थानिक प्रशासनासह आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.
मलकापुरात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत बाधितांचा आकडा झपाट्याने कमी झाला होता. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच शहराला कोरोनामुक्त केले होते. मात्र, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जून २० रोजी पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला होता आणि शहरात टप्प्याटप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्यापासून बाधितांची संख्या कमी-कमी होत गेली. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन-तीन जण बाधित येत होते, तर डिसेंबर महिन्यात केवळ १८ जणच बाधित सापडले, तर एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी बाधित होण्याचे थांबलेले नव्हते. जानेवारी महिन्यात पुन्हा वाढ होत गेली. १५ जण पॉझिटिव्ह आले. फेब्रुवारीमध्ये १९, तर मार्च महिन्यात ७७ रुग्ण वाढले. यापुढे जाऊन ६ मे अखेर एका महिन्यात तब्बल ४५३ बाधित सापडले, तर १६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यावरून सप्टेंबर महिन्याची पुनरावृत्ती होऊन मलकापुरात सध्या तब्बल २२४ ॲक्टिव्ह रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
(चौकट)
२२ एप्रिल ते २४ मे ३१
२५ मे ते २५ जून ०
२६ जून ते २६ जुलै ४३
२७ जुलै ते २६ ऑगस्ट ३३८
२७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर ४२८
२७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर १५९
२८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर ६९
२८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १८
३१ डिसेंबर ते ३० जानेवारी १५
३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी १९
१ मार्च ते २ एप्रिल ७७
२ एप्रिल ते ६ मे ३४ दिवसांत ४५३
(चौकट)
एकूण- १६५५
मृत्यू - ५४
डिस्चार्ज -१३७७
उपचारार्थ - २२४
रुग्णालयात - १११
होम आयसोलेट - ११३
(चौकट)
मुक्तीचा दर ८३.२ टक्के
मृत्यूदर ३.३ टक्के
ॲक्टिव्ह रुग्ण १३.५ टक्के