कोरोनाची भीती,व्यवसायाची चिंता; कसा सोडवायचा गुंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:11+5:302021-04-08T04:39:11+5:30
कराड : कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतोय न सावरतोय तोच दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले आहे. दररोज बाधितांची ...
कराड : कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरतोय न सावरतोय तोच दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले आहे. दररोज बाधितांची समोर येणारी आकडेवारी सर्वांची धास्ती वाढवत आहे. कोरोना लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला अजून वेळ जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मिनी लाॅकडाऊन पुकारला आहे. मात्र, याला व्यापारी वर्गातून मोठा विरोध होत असून, हा गुंता कसा सोडवायचा, हा प्रशासनासमोर प्रश्न आहे.
सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. सध्यातरी गरजू रुग्णांना लगेच बेड उपलब्ध होताना दिसतात. पण, रुग्णसंख्या झपाट्याने वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, या भीतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन घोषित केला आहे.
त्यामुळे सध्या अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू आहेत. इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मिळाल्याने गत वर्षभरात कंबरडे मोडलेल्या व्यावसायिकांना आता आपल्या व्यवसायाची चिंता वाटू लागली आहे. घातलेले भांडवल, येणारा खर्च, बँकेचे हप्ते, भाडोत्री जागेचे भाडे या साऱ्याचा मेळ कसा घालायचा, हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे याविरोधात व्यापारीवर्गात असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
व्यापारी रस्त्यावर उतरले तर नवाच प्रश्न समोर उभा राहणार आहे. त्यामुळे निर्माण होणारा हा गुंता कसा सोडवायचा, हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. एका बाजूला कोरोनाची भीती, तर दुसर्या बाजूला असणारा व्यापार्यांचा विरोध या साऱ्यावर प्रशासन नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटलांना व्यापारी भेटले
सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुकारलेला मिनी लाॅकडाऊन चुकीचा आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ करणारा आहे. यावर पुनर्विचार झाला पाहिजे. अशा भावना कराड येथील व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील यांना भेटून व्यक्त केल्या आहेत. यावर दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, ते काय भूमिका घेणार, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
पालकमंत्र्यांनाही व्यापारी भेटणार
जिल्ह्यात पुकारलेल्या मिनी लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेले व्यापारी येत्या दोन दिवसात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनाही भेटणार असल्याचे खात्रीशीर समजते. व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेऊन पालकमंत्र्यांनी सर्व प्रकारची दुकाने नियम व अटी घालून उघडायला परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी करणार असल्याचे समजते.
कोट
व्यापारी हा सहनशील आहे. म्हणून त्याच्यावर अन्याय करू नका. ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेत न येणारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे. मुळातच व्यावसायिक अडचणीत आहेत. अशावेळी हा निर्णय त्याला अधिक अडचणीत आणणारा आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी निर्णय मागे घ्यावा. सर्व प्रकारची दुकाने उघडायला परवानगी द्यावी. आम्ही नियम पाळायला तयार आहोत.
जितेंद्र ओसवाल
व्यावसायिक, कराड
कोट
अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडायला सध्या परवानगी आहे. पण, हा निर्णय चुकीचा आहे. प्रशासनाने सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी दिली पाहिजे. प्रशासकाचा मिनी लाॅकडाऊनचा निर्णय व्यापाऱ्यांवर कुऱ्हाडा चालवणारा आहे. उलट प्रशासनाने बेफिकीरपणे वागणाऱ्या नागरिकांवर कारवाई करायला हवी आहे. मात्र, प्रशासन दुकानदारांवर कारवाई करत आहे. ही बाब चुकीची आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा.
नितीन मोटे
अध्यक्ष, कराड व्यापारी महासंघ