मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:36+5:302021-06-01T04:28:36+5:30

तरडगाव : ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी... पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...’ हे गीत ...

Corona fence to uncle's village! | मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

मामाच्या गावाला कोरोनाचे कुंपण!

Next

तरडगाव : ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी... पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...’ हे गीत सद्यस्थितीत मुलांसाठी विरोधाभास बनले आहे. कारण या मार्गात कोरोनारुपी मोठा राक्षस उभा असल्याने ही सफर सध्या होणं अशक्यच आहे. कोरोनाच्या भीतीने ठिकठिकाणच्या गाव सीमा बंद केल्याने भाच्यांची इच्छा असूनही मामाच्या गावाला जाणे कठीण झाले आहे.

परीक्षा संपल्यानंतर शाळेला सुट्टी लागल्यावर कधी एकदा मामाच्या गावाला जातोय, असे मुलांना वाटत असते. तिकडे गेल्यावर झाडांवर झोके घेणे, आंबे खाणे, पोहायला जाणे, बालमित्रांसोबत दंगामस्ती करत विविध खेळ खेळणे, यासारख्या अनेक बालवयातील हरकती मुलांकडून होत असतात. मात्र, गेल्या दोन उन्हाळी सुट्ट्या या कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाया गेल्याची खंत मुलांना बोचत आहे. आजोळी जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगून हे दिवस पुन्हा येणार नाहीत, या कल्पनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. नातलग व सवंगड्यांची भेट न झाल्याने या बालमित्रांना चुकल्यासारखे होत आहे.

कोरोनामुळे नातेवाईकांची भेट दुरावली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची विचारपूस केली जात आहे. काही जवळच्या नात्यातील व्यक्तीचा कोरोनाने झालेला मृत्यू चटका लावून जात आहे. दरम्यान, प्रत्येकजण दूर असला तरी काळजी घ्या, हे दोन आपुलकीचे दिलासा देणारे शब्द एकमेकांबद्दल तोंडातून निघत आहेत.

(चौकट)

मोबाईलचा अतिवापर...

कोरोना संक्रमणाचा धोका मुलांनाही बसू लागल्याने त्यांचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. लिंकवरील स्वाध्याय सोडविण्याबरोबर इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात ते मग्न असतात. एकंदर कोरोनामुळे मामाच्या गावाला जाता न आल्याने हिरमोड झाल्यासारखी स्थिती मुलांची झाली आहे.

Web Title: Corona fence to uncle's village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.