बिबी लोकसहभागामुळे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:25 AM2021-06-29T04:25:50+5:302021-06-29T04:25:50+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील बिबी गावात कोरोनाचे रूग्ण वाढत होते. त्याबरोबर मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना गावातून तरुण मंडळ, ...
आदर्की : फलटण तालुक्यातील बिबी गावात कोरोनाचे रूग्ण वाढत होते. त्याबरोबर मृत्यूंचे प्रमाण वाढत असताना गावातून तरुण मंडळ, ग्रामपंचायत, मारूती देवस्थान ट्रस्ट यांनी विलगीकरण कक्ष सुरु केल्यानंतर ७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बिबी गाव कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णांना फळझाडे देण्यात आली.
बिबीमध्ये एप्रिल-मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूदरही वाढला होता. गावात कोरोना संसर्गामुळे संपूर्ण कुंटुंबच कोरोनाबाधित होत असल्याने गाव भीतीच्या सावटाखाली होते. गावातील मारूती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, तरुण मंडळ यांनी सरस्वती माध्यमिक विद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. ग्रामस्थांना लोकवर्गणी देण्याचे आवाहन केल्याने गावातील व चाकरमानी, मारूती देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, तरुण मंडळ यांनी रोख व वस्तूरूपात साडेतीन लाख रुपयांची मदत केली आहे. डॉ. कल्याण बोबडे, डॉ. सुशील बोबडे, डॉ. संदीप खताळ यांनी उपचार केले. बिबी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी तरुण मंडळ, चाकरमानी, शिक्षक, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
फोटो २९ बिबी
बिबी (ता. फलटण) येथे कोरोनामुक्त रूग्णांना फळझाडे भेट देण्यात आली. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)