जिल्ह्यात कोरोना वाढीचा दर सव्वा बारा टक्क्यांवर, रुग्ण वाढ रोखण्याचे मोठे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 02:38 PM2022-01-10T14:38:02+5:302022-01-10T14:38:48+5:30
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ३७३ कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने ...
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवारी ३७३ कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने वाढून सव्वा बारा टक्क्यांवर पोहोचला आहे.
नववर्षाच्या मध्यरात्रीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. पुणे, मुंबई प्रमाणेच आता साताऱ्यात देखील रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळते. रुग्ण वाढीचा दर विक्रमीरीत्या वाढल्याचे पाहायला मिळते. रविवारी ३ हजार ७० कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून ३७३ लोक बाधित सापडले आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्हावासीयांसाठी चिंताजनक ठरली असून, रुग्ण वाढ अशीच वाढ राहिली तर हॉस्पिटल देखील पुरणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी आलेल्या तपासणी अहवालामध्ये ३४० लोक कोरोना बाधित आढळले. त्याच्याआधी २९२, २४२ असा रुग्ण वाढीचा आलेख वाढताना पाहायला मिळतो आहे.
अजूनही लसीबाबत अंधश्रद्धा
कोरोना लसीकरणावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, लोकांमध्ये अजून देखील लसीबाबत अंधश्रद्धा आहे. अनेक लोक चुकीचे कारण पुढे करून लस घेणे टाळतात. अशा लोकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.
ज्यांनी एकही लस घेतली नाही, त्यांच्यासाठी तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती गंभीर असेल. मुंबई शहराचा विचार केल्यास ज्यांनी लस घेतलेली नाही, असे लोक बाधित आढळल्यास त्यांनाच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली आहे. ९६ टक्के लोक या परिस्थितीमध्ये आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये देखील तसे होऊ शकते, त्यामुळे लसीकरण करणे आवश्यक आहे. - शेखर सिंह, जिल्हाधिकारी