जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने, रुग्ण वाढीचा दर १५ टक्क्यांच्या पुढे, ३७८ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 02:26 PM2022-01-11T14:26:06+5:302022-01-11T14:36:01+5:30
जिल्ह्याची वाटचाल लॉकडाउनच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते.
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच रुग्ण वाढीचा दर पंधरा टक्क्यांच्यावर पोहोचला. सोमवारी घेण्यात आलेल्या तपासण्यांमधून ३७८ लोक कोरोना बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने असल्याचे पाहायला मिळते.
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३७८ लोक कोरोना बाधित आढळले. रुग्ण वाढीचा दर झपाट्याने वाढून १५.४ टक्क्यांवर पोहोचलेला आहे. चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी त्यातुलनेत रूग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. २ हजार ५१३ कोरोना चाचण्यांमधून ३७८ लोक बाधित आढळले. प्रशासनाने कोरोना चाचण्यांवर आणखी भर दिला तर रुग्ण संख्येतील वाढ जास्त प्रमाणात दिसून येऊ शकते.
रुग्णवाढीचा दर १५ टक्क्यांवर पोहोचला असल्यामुळे सातारा जिल्ह्याची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा तर पूर्णपणे बंद केले आहेत. इतर आस्थापनांवर देखील निर्बंध लादले जाऊ शकतात. मागील वर्षी राज्य शासनाने जिल्ह्यांचे वर्गीकरण केले होते, त्यानुसार आत्ताची रुग्ण वाढ ही जिल्ह्याला रेड झोन मध्ये नेणारी ठरली आहे.
रूग्णांसाठी तारणहार ठरलेले जम्बो कोवीड अजूनही बंद स्थितीमध्ये आहे. जिल्ह्यातील इतर कोविड सेंटर्स सुरू करण्याच्या अनुषंगाने प्राथमिक तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करू करावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान..
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. रुग्ण वाढीच्या प्रभावामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे. दहावी बारावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा स्तरावरील परीक्षा सुरू होत्या. त्या रद्द कराव्या लागल्या. लोकसेवा, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा रुग्ण वाढीमुळे वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. या परिस्थितीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच नोकरीच्या शोधात असलेले विद्यार्थी यांचे देखील मोठे नुकसान होताना दिसत आहे.