कोरोनामुळे तमाशा कलावंतावर खेळणी विकण्याची वेळ!, सलग तीन वर्षे उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 01:34 PM2022-01-31T13:34:40+5:302022-01-31T13:38:18+5:30
तमाशा कलावंताच्या कुटुंबांची रस्त्यावर उतरून रोजगार मिळवण्यासाठी धरपड
संजय कदम
वाठार स्टेशन : सलग तीन वर्षे कोरोना महामारीने अनेकांचं जगणं मुश्कील केले आहे. कोरोनाचा फटका तमाशा कलावंत व जागरण पार्टी मालकानाही बसला आहे. भाडळेतील दिवंगत बाळासाहेब भाडळेकर याचं कुटुंबियांनी तमाशासाठी २५ लाखांचं कर्ज उरावर असताना जीव जगवण्यासाठी या तमाशा कलावंताचे कुटुंब रस्त्यावर उतरून रोजगार मिळवण्यासाठी धरपडत आहे. वाठार स्टेशनमध्ये या कुटुंबातील लोक मासे विक्री, लहान मुलांची खेळणी विकून रोजगाराच्या वाटा शोधत आहेत.
कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले तर अनेक व्यवसाय बंद झाले. गर्दी करणारे सर्वच व्यवसाय बंद झाले. महाराष्ट्राची लोककला जोपासणारी तमाशा कला ही या तीन वर्षांत लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षातील मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत गावोगावी यात्रेत मागणी असणारे तमाशे तीन वर्षात दिसले नाहीत.
या कलाकारांनी कोरोना काळात नक्की केलं तरी काय? शासनाने त्यांना काय दिले की केवळ लोककला म्हणून मान दिला. वाठार स्टेशनसारख्या गावात ही लोककला जोपासणारी कलावंत मंडळी मिळेल ते काम करून पैसे मिळवत घर प्रपंच चालवत आहेत. शासनाने अशा लोककलावंतांना मदत करणं गरजेच आहे. तरच ही लोककला जिवंत राहील अशी परिस्थिती आहे.
गेली चार पिढ्या आम्ही लोकांना हसवण्याचं त्याचं मनोरंजन करण्याचं काम करीत आहे. लोककला जोपासताना कलाकारांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या गेली तीन वर्षे ही कला बंद आहे. पण यासाठी काढलेल्या कर्जाचं काय ते कसं फेडायचं हा प्रश्न आहे. सरकारन यासाठी मदत करावी. - विशाल भाडळेकर, तमाशा मालक